1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2024 (18:32 IST)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ : शाहू महाराजांविरोधात कोणता उमेदवार महायुती देणार?

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की महायुती जागावाटपाचा पेच सुटल्याचं चित्र नाहीये. भाजपने वीस जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी उर्वरित मतदारसंघांमध्ये अजूनही भाजप-अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामधला जागा वाटपाचा सस्पेन्स कायम आहे.
 
दुसरीकडे, महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं गणित सुटलंय असं दिसत नाहीये. पण इतर मतदारसंघांबाबत चर्चा सुरू असली, तरी एका मतदारसंघातल्या उमेदवारीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचं एकमत झालं आहे.
 
तो मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
 
निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरत असलेले शाहू छत्रपती हे काँग्रेसकडून उमेदवारी लढतील यावरही तिन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आहे.
 
थेट छत्रपतींनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं निश्चित करून महाविकास आघाडीने आपला डाव खेळला आहे, आता त्याला महायुतीकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं रंजक असेल.
 
भाजप शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील समरजित घाटगेंना उमेदवारी देणार की धनंजय महाडिकांना मैदानात उतरवणार? युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघावर एकनाथ शिंदे दावा सांगणार का? असे अनेक प्रश्न आहेत.
 
या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणारच आहोत, पण त्यापूर्वी या मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास, इथल्या विधानसभा मतदारसंघतलं राजकीय बलाबल, शाहू छत्रपतींच्या उमेदवारीने इथं काय परिणाम होऊ शकतो, यावरही चर्चा करणार आहोत.
 
काँग्रेसचा बालेकिल्ला, नंतर राष्ट्रवादीला साथ
कोल्हापूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. 1957 आणि 1977 च्या निवडणुकीत इथे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता.
 
हा अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1998 पर्यंत कोल्हापूरनं आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं होतं.
 
1980 ते 1998 असा सलग काळ काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं होतं. 1998 मध्ये सदाशिवराव मंडलिक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.
 
1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिवराव मंडलिक हे शरद पवारांसोबत आले. त्यानंतर 1999, 2004 ला मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले.
 
2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली. पवारांच्या इतक्या विश्वासू साथीदाराने बंडखोरी करण्यामागे कारण छत्रपतींच्या घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी ठरली होती.
 
संभाजीराजे छत्रपतींची उमेदवारी, मंडलिकांचं बंड आणि म्हातारा बैल
शरद पवार आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यामध्ये 2009 च्या निवडणुकीआधी मतभेद निर्माण व्हायला सुरूवात झाली होती. त्याला हसन मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यामधील अंतर्गत राजकारणाची किनार असल्याचं म्हटलं जात होतं.
 
या निवडणुकीच्या वेळी धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रवादीकडून उमेदवारासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी सर्व राजकीय समीकरणांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली.
 
सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शरद पवारांनी कोल्हापुरात सहा सभा घेतल्या होत्या.
 
प्रचारादरम्यान शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने मंडलिकांच्या बाजूने भावनिक वातावरण तयार झालं. ‘बैल म्हातारा झाला की काय करतात हे आपल्या सर्वांना माहितीये’ शरद पवारांनी मंडलिकांच्या वयाबद्दल केलेलं हे वक्तव्य कोल्हापूरकरांच्या फार पचनी पडलं नाही.
 
सदाशिवराव मंडलिकांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेकडून विजय देवणे यांनी निवडणूक लढवली होती.
 
सदाशिव मंडलिकांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
मोदी लाटेतही राष्ट्रवादीने टिकवला मतदारसंघ
2014 साली कोल्हापूरमधून आपल्या मुलाने संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवावी अशी सदाशिवरावांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी पण केली होती.
 
मात्र, ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि अहमदनगरप्रमाणेच ही जागाही काँग्रेससाठी सोडायला शरद पवार तयार नव्हते.
 
त्यामुळे मग संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली.
 
2014 साली देशभरात नरेंद्र मोदींची लाट असतानाही धनंजय महाडिकांनी संजय मंडलिकांचा पराभव केला.
 
महाडिकांना 6 लाख 7 हजार 665 मतं पडली, तर मंडलिकांना 5 लाख 74 हजार 406 मतं पडली.
 
2019 च्या निवडणुकीत काय झालं?
2019 च्या निवडणुकीत शिवसेनेनं पुन्हा संजय मंडलिकांनाच उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी देण्यात आली.
 
या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा पाठिंबा हा एक महत्त्वाचा घटक ठरला होता. महाडिक-पाटील कुटुंबातील वादाचा इतिहास सर्वश्रुतच आहे.
 
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतानाही सतेज पाटील यांनी या निवडणुकीत उघडपणे ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत संजय मंडलिकांना पाठिंबा दिला. आघाडीतली ही बिघाडी आणि मोदी लाट या दोन्हींचा फायदा संजय मंडलिकांना झाला आणि ते जवळपास अडीच लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले.
 
पण या निवडणुकीनंतर अनेक गोष्टी बदलल्या. धनंजय महाडिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आता ते भाजपमध्ये आहेत.
 
शिवसेनेत फूट पडली आणि संजय मंडलिक हे सध्या एकनाथ शिंदे गटासोबत आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसही दुभंगली आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या निवडणुकीतली समीकरणं ही अधिक गुंतागुंतीची आणि रंजक होऊ शकतात. याचाच अंदाज असल्याने महाविकास आघाडीने ज्यांच्या उमेदवारीने कोणताही वाद होणार नाही अशा व्यक्तीची निवड केली...श्रीमंत शाहू छत्रपती.
 
शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे चित्र कसं बदलेल?
शाहू छत्रपतींनी आतापर्यंत थेट कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी 2009 साली लोकसभेची निवडणूक लढवली होती, तर त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनी 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती.
 
संभाजीराजे हे राज्यसभेचे नामनिर्देशित खासदारही होते.
 
पण शाहू छत्रपती मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. पण 1990 ला पहिल्यांदा ते राजकीय मैदानात दिसले होते. करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय खानविलकर होते. त्यांच्याविरोधात एस. आर. पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. त्याकाळी काही कारणांमुळे शाहू महाराज यांनी एस. आर. पाटील यांचा प्रचार केला होता.
 
त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे हयात असताना 1998 साली शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसले होते. मात्र, तेव्हाही त्यांनी निवडणुकीचा पर्याय अवलंबला नव्हता.
 
आता मात्र शाहू महाराज हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. थेट छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती, ज्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे, ज्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वमान्य आहे, ज्यांच्याबद्दल नकारात्मकता नाहीये, अशा उमेदवाराविरोधात नेमका प्रचार कसा करायचा याची रणनीती महायुतीला आखावी लागणार आहे.
 
पण त्याआधी ही जागा लढवणार कोण हाही महायुतीतला कळीचा मुद्दा असेल. कारण सध्या इथले खासदार संजय मंडलिक आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. कोल्हापूरची जागा ही शिवसेना लढवत आली आहे. त्यामुळे शिंदे गट या जागेवर दावा सांगू शकतो. पण कोल्हापुरातील जाणकारांच्या मते मंडलिकांबद्दल फारसे पॉझिटिव्ह रिपोर्ट नसल्याने उमेदवार बदलला जाऊ शकतो.
 
अशावेळी भाजप इथून समरजित घाटगे यांना उमेदवारी देईल अशी चर्चा आहे. राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे विरुद्ध त्यांचे दत्तक घराणे असं चित्र या निमित्ताने उभं करता येईल.
 
दुसरा पर्याय धनंजय महाडिक यांचाही आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जी क्षमता लागते, ती महाडिकांकडे आहे.
 
त्यामुळे शाहू महाराजांविरोधात लढत उभी राहू शकेल असा उमेदवार देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाईल हे निश्चित.
 
विधानसभा मतदारसंघातील चित्र
उमेदवारीचा विचार करताना विधानसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल हादेखील एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
 
छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देताना महाविकास आघाडीने हा विचारही केलेला दिसतो. त्यामुळेच शिवसेना किंवा राष्ट्रवादीऐवजी शाहू महाराज हे काँग्रेसकडून निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित आहे.
 
कोल्हापूरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत-
 
1. करवीर 2. दक्षिण कोल्हापूर 3. उत्तर कोल्हापूर 4. कागल 5. चंदगड 6. राधानगरी
 
या सहापैकी तीन मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. करवीरमधून काँग्रेसचे पी. एन. पाटील, दक्षिण कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील, उत्तर कोल्हापूरमधून जयश्री जाधव.
 
कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत, जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चंदगडचे आमदार राजेश पाटील हेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आबिटकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत.
 
फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची कोल्हापुरात तितकी ताकद दिसत नाहीये. काँग्रेसकडे विधानसभेचे तीन, तर विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. (सतेज पाटील आणि जयंत आसगावकर.)
 
सतेज पाटील यांनी राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातही पक्षाची बांधणी केली आहे. गेल्यावेळी संजय मंडलिकांच्या विजयात त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. यांमुळेच कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेस लढवेल.
 
दुसरीकडे, समरजित घाटगेंना उमेदवारी मिळाली तर कागलमधल्या मुश्रीफ-घाटगे संघर्षाचा फटका काही प्रमाणात बसू शकतो. महाडिकांना उमेदवारी मिळाली तर कदाचित राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना पाठिंबा मिळू शकतो.
 
कोल्हापुरातील समस्या
उमेदवार कोणता असेल, कोणाच्या पारड्यात कोल्हापूरकर वजन टाकतील यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोल्हापूरच्या समस्या सुटतील का?
 
कोल्हापूरची आताची सर्वांत मोठी समस्या ही कनेक्टिव्हिटी आहे. ती वाढवण्याची गरज सध्या आहे.
 
कोल्हापूरच्या विमानतळाचं उद्घाटन पुन्हा झालं, दोन-तीन दिवसांपूर्वी त्याचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पण इथून विमानसेवेची फ्रिक्वेन्सी किती असेल, हे अजूनही स्पष्ट नाही.
 
रेल्वेचीही कनेक्टिव्हिटीही तुलनेनं कमी आहे. मुंबईला जाणारी एक गाडी सध्या आहे. कोरोना काळात बंद पडलेली सह्याद्री एक्सप्रेस अजूनही सुरू झाली नाहीये.
 
वंदे भारत सुरू होण्याचीही शक्यता आहे.
 
कनेक्टिव्हिटीच्या मुद्द्यामुळे सध्या कोल्हापुरात मोठ्या उद्योगांचा विकास झाला नाहीये. सध्या कोल्हापुरात केवळ स्पेअर पार्ट्स बनवणारे उद्योग आहेत.
 
चित्रनगरीत पूर्वी शूटिंग व्हायची. पण जर विमानतळ आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी उत्तम असेल, तर त्याचाही विकास होऊ शकतो.
 
कोल्हापुरातील आयटी पार्कचा विषयही बराच काळ प्रलंबित आहे.
 
गेल्या काही काळात बदलत्या हवामानाचा फटकाही कोल्हापूरला बसला आहे. पावसाचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळे शहरात सातत्याने येणारे पूर हे चित्र पाहायला मिळालं आहे.
 
या समस्येचा विचार करून नगरनियोजनाचं आव्हान पेलावं लागेल.
 
या मुद्द्यांबरोबच गेल्या काही काळात उसवत चाललेली सामाजिक-धार्मिक वीण हा कोल्हापूरकरांसाठी चिंतेचा विषय आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हिंदू सकल समाजाचे मोर्चे निघाले, शेकडोच्या संख्येने या मोर्चांमध्ये लोक सहभागी झाले. या मोर्चांमध्ये देशाला हिंदू राष्ट्र करण्याची मागणी झाली. लव्ह-जिहाद विरोधात कायदा आणा, गोहत्याबंदी कायदा आणा अशा अनेक मागण्या करण्यात आल्या.
 
हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा असलेल्या या शहरात व्हॉट्स अप स्टेटसवरून धार्मिक तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.