शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2024
  3. लोकसभा निवडणूक 2024 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (18:56 IST)

एका मताचा फरक ते 48 मतांनी विजय, रविंद्र वायकर विरुद्ध कीर्तिकर लढतीत नेमकं काय घडलं?

Facebook
मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची लढत अटीतटीची तर ठरली परंतु शेवटच्या क्षणाला अवघ्या काही मतांनी निर्णय वळवणारी सुद्धा ठरली.
 
या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा या लढतीत पराभव झाला.
 
परंतु अगदी रात्री 9.30 वाजेपर्यंत हा निकाल स्पष्ट झालेला नव्हता. सुरुवातीला विजयी झालेल्या अमोल कीर्तिकरांचा पुन्हा झालेल्या मतमोजणीत 48 मतांनी पराभव कसा झाला? नेमकं मतमोजणीदरम्यान काय घडलं? आणि या मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत कशी रंगली? जाणून घेऊया,
 
पोस्टल मतांच्या फेरमोजणीनंतर 48 मतांनी विजय
मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघाकडे सर्वांचं विशेष लक्ष होतं. याचं कारण होतं या तीन मतदारसंघांमध्ये होणारी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत.
 
मुंबई कायमच शिवसेनाचा बालेकिल्ला राहिली आहे. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई कोणत्या शिवसेनेची? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? यामुळे मुंबईची लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
 
मंगळवारी (4 जून) अगदी संध्याकाळी निकाल स्पष्ट होईपर्यंत या तिन्ही जागा ठाकरे गटाच्या पारड्यात होत्या. शिवसेना ठाकरे गटाचं मुख्यालय शिवसेना भवनात एकच जल्लोष सुरू होता.
मुंबईतील तिन्ही जागांवर शिंदे गटाविरोधात आपण लोकसभेची लढाई जिंकली याचा आनंदोत्सव साजरा केला जात होता. परंतु अचानक एका मतदारसंघातील चुरशीच्या लढाईमुळे कार्यकर्ते काही क्षण थांबले.
 
आपआपल्या फोनवर उत्तर-पश्चिम मतदारसंघाची माहिती मिळवण्याची गडबड सेना भवनात सुरू झाली.
 
मुंबईतील उत्तर-पश्चिम या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली. तर एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांना उमेदवारी दिली.
 
दोन्ही उमेदवार हे मराठी चेहरा असलेले शिवसेनेशी घट्ट संबंध असलेले जुने नेते. एकाबाजूला विद्यमान खासदाराचा मुलगा तर दुसरीकडे स्थानिक आमदार.
ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं की उत्तर-पश्चिम जागा ही शिवसेना ठाकरे गटाला सहज जिंकता येईल. परंतु प्रत्यक्षात या मतदारसंघातील लढत अत्यंत अटीतटीची झाली.
 
सुरुवातीच्या मतमोजणी फेरीत रविंद्र वायकर आघाडीवर होते. परंतु त्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी आघाडी घेत त्यांना 2 हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आले. यानंतर रविंद्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली.
 
पोस्टल मतांमध्ये अमोल कीर्तिकर 2100 मतांनी आघाडीवर होते. यामुळे रविंद वायकर यांनी पोस्टल मतांच्या फेरमतमोजणीची मागणी केली. या फेर मतमोजणीत मात्र रविंद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला.
 
तसंच ईव्हीएमच्या मतमोजणीतही अमोल कीर्तिकर आणि रविंद्र वायकर यांच्यात एक मताचा फरक होता. कीर्तिकर एका मताने आघाडीवर दिसत होते. कीर्तिकर यांना 4 लाख 995 मतं होती तर रविंद्र वायकर यांना 4 लाख 994 मतं होती.
 
परंतु पोस्टल मतांच्या मोजणीनंतर वायकर विजयी असल्याचं घोषित करण्यात आलं. एकूण 3 हजार 49 पोस्टल मतं होती. यापैकी अमोल कीर्तिकर यांना 1500 मतं तर वायकर यांना 1549 मतं मिळाली.
 
निकालाला आव्हान देणार?
अमोल किर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाल्याने मतमोजणी दरम्यान काहीतरी गोंधळ झाल्याची शंका शिवसेना ठाकरे गटाला आहे.
 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (4 जून) पत्रकार परिषदेदरम्यान यावर भाष्य केलं.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "अमोल कीर्तिकर यांचा पराभव जाहीर झालेला नाही तिकडे काहीतरी गडबड आहे. या निवडणुकीला आम्ही आव्हान देण्याचा विचार करत आहोत. तिकडे एकूणच गडबड घोटाळा दिसत आहे. आम्ही बहुतेक इथल्या मतमोजणीला आव्हान देऊ."
तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही जागा जिंकलेले नाहीत तर चोरलेली जागा आहे अशी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
संजय राऊत म्हणाले,"अमोल कीर्तिकरांची जागा समोरचे लोक जिंकलेले नाहीत तर चोरलेली आहे."
 
काही मोजक्या मतांनी विजय हुकल्याने आणि मतमोजणी केंद्रावर वारंवार करण्यात आलेल्या फेरमतमोजणीच्या गोंधळामुळे उद्धव ठाकरे या निकालाला न्यायालयात किंवा केंद्रीय निवडणूक आयोगात आव्हान देऊ शकतात.
 
दरम्यान, मतमोजणी केंद्रावर विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या निकालाला आव्हान देता येतं का? यासंदर्भात घटनातज्ज्ञ उल्हास बापट सांगतात,
 
"निवडणूक चालू असताना त्यात हायकोर्टाला वा सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही. पण निवडणूक संपल्यानंतर, ही निवडणूक चुकीच्या पद्धतीने घेतली जातेय, याची कारणं दिलेली आहेत कायद्यामध्ये, तर पिटीशन करता येते हायकोर्टाकडे. हायकोर्ट ते पिटीशन घेऊ शकतं किंवा डिसमिस करू शकतं. किंवा त्यावर विचार करून, केस चालवून एखाद्याची निवडणूक ही व्हॉईड आहे असं ठरवू शकतं.
 
"किंवा एखाद्याची निवडणूक, जो निवडून आलेला नाही, त्याला निवडून आलाय, असंही जाहीर करू शकतं. हे सगळे अधिकार हायकोर्टाला दिलेले आहेत. हायकोर्टाच्या निर्णयानंतर तुम्हाला शंका असेल तर कुठल्याही हायकोर्टाच्या निर्णयाकडून सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं. हायकोर्टाचा जो निर्णय असतो तो एका जजने दिलेला असतो. याच्यासाठी बेंच नसतो. सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो अंतिम असतो. तो अर्थातच निवडणूक आयोगाला कळवला जातो आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागते," बापट सांगतात.
 
'हारलेला मनुष्य असंच म्हणतो'
विजयी खासदार रविंद्र वायकर यांची बीबीसी मराठीने या सर्व प्रकाराबाबत प्रतिक्रिया घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितलं, "वाजपेयींचं सरकार एका मताने कोसळलं होतं. त्यानंतर पुन्हा निवडणूक लागली. मग जर एका मताने एवढं काही होऊ शकतं. प्रत्येक मताची किंमत असते. असे तर मला 48 मतं मिळाली आहेत. ही खूप झाली मला. यामुळे एक मताने जरी निवडून आलो तरी तो विजयच असतो."
 
"मतमोजणी केंद्रावर कोणालाही मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नव्हती. मी टिव्हीवर पाहिलं की कीर्तिकर 2 हजार मतांनी विजयी झाले. परंतु मी मतमोजणी केंद्रावर गेलो त्यावेळी तिकडे मतमोजणी सुरू होती. विजय घोषित केलेलाच नव्हता. मग आधीच चॅनेल्सवरती विजयी कसं घोषित केलं? मतमोजणी सुरू असताना निकाल कसा घोषित होऊ शकतो?" असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
 
मी एकदाही फेरमोजणीची मागणी केलेली नाही असंही वायकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
 
उद्धव ठाकरे यांनी मतमोजणी केंद्रात काहीतरी गडबड झाल्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना वायकर म्हणाले,"हरलेला मनुष्य असंच करत असतो. त्याला माझ्याकडे उत्तर नाही. निकालाला आव्हान देण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. ते वापरू शकतात."
 
वडिलांचं समर्थन असलेल्या पक्षातील उमेदवाराचा विजय
या मतदारसंघातील मतमोजणी जितकी रंगतदार ठरली तितकच इथलं राजकारण सुद्धा चर्चेत होतं.
 
ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचे वडील गजाजन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार तर होतेच पण त्यांनी शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर केलं होतं.
 
युवा सेनेत सक्रिय असलेले अमोल कीर्तिकर मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कायम राहिले. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी अमोल कीर्तिकरांचे वडील जरी शिंदेंच्या शिवसेनेत असले तरी त्यांना उमेदवारी दिली.
 
उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही गजानन कीर्तिकर यांनी आपली भूमिका कायम ठेवत शिंदेंसोबतच राहिले.
 
यामुळे या लढतीत वडील हे आपल्या मुलाच्या विरोधी उमेदवाराच्या पक्षात होते.
 
दुसरीकडे रविंद्र वायकर ज्यांनी 48 मतांनी विजय मिळवला त्यांचं नावही बरंच चर्चेत राहिलं. याचं कारण म्हणजे त्यांनी निवडणुकीच्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला.
 
रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथे भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांच्यावर इडीची चौकशी सुद्धा सुरू आहे. या चौकशी दरम्यानच वायकर यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला.
 
वायकर यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य सुद्धा निवडणुकीपूर्वी चर्चेत राहिलं. वायकर म्हणाले होते, तुरूंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते.
 
या वक्तव्यानंतर रविंद्र वायकर यांना स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलं होतं.
 
उत्तर पश्चिम मतदारसंघाचं राजकीय गणित
या मतदारसंघात जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम,अंधेरी पूर्व हे परिसर येतात.
 
या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेना तर तीनमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहे.
 
2014 साली मोदी लाटेत या मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर विजयी झाले. 2019 सालीही कीर्तिकर यांना पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.
 
2014 साली त्यांनी गुरुदास कामत यांना पराभूत केलं होतं तर 2019 साली त्यांनी संजय निरुपम यांना पराभूत केलं. आता कीर्तिकर शिवसेनेच्या शिंदेगटात आहेत.
 
आतापर्यंत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी शिवसेना भाजप आणि काँग्रेस आघाडी अशा दोन्ही बाजूंना कौल दिलेला दिसतो.
 
1967 साली काँग्रेसचे शांतीलाल शहा आणि 1971 साली काँग्रेसचेच हरी रामचंद्र गोखले विजयी झाले होते. मात्र आणीबाणीनंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाची लाट आली होती. त्यावेळेस जनता पक्षाकडून राम जेठमलानी यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
 
1980 साली इंदिरा गांधी यांनी जोरदार पुनरागमन केलं असलं तरी या मतदारसंघात जेठमलानी यांच्याच पारड्यात लोकांनी आपलं दान टाकलं.
1984 साली इंदिरा गांधी यांच्याहत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मोठी लाट देशभरात होती.
 
यावेळेस काँग्रेसने या मतदारसंघात अभिनेते सुनील दत्त यांना संधी दिली. 1984 साली दत्त या मतदारसंघातून लोकसभेत गेले आणि त्यांनी हीच किमया 1989 आणि 1991 साली साधली.
 
परंतु 1996 साली शिवसेनेचे मधुकर सरपोतदार इथून विजयी झाले. 1998 सालीही सरपोतदार यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.
 
1999 च्या निवडणुकीत र सरपोतदार यांना पराभूत करण्यात दत्त यशस्वी झाले आणि ते चौथ्यांदा खासदार झाले.
 
2004 साली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत आले असतानाही त्यांना ही संधी मिळाली ते केंद्रात मंत्रीही झाले. मात्र पुढच्याच वर्षी त्यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक घ्यावी लागली.
 
या पोटनिवडणुकीत दत्त यांची कन्या प्रिया दत्त विजयी झाल्या. 2009 साली काँग्रेसच्या बाजूने मतदारांचा कल असताना दत्त यांनी आपला मतदारसंघ बदलला. तेव्हा या मतदारसंघात गुरुदास कामत यांचा विजय झाला. तर प्रिया दत्त मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात विजयी झाल्या.

Published By- Priya Dixit