मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 18 मार्च 2024 (15:51 IST)

मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली का जात नाही? ती कुठे बनते?

voters
निवडणुकीत मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. तुम्ही मतदान केलं आहे, याचा पुरावा म्हणजे बोटावर लावलेली ही शाई. यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे, हे सुनिश्चित केलं जातं. म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्यांदा मत देऊ शकत नाही.कारण ही शाई अशी असते, जिचा डाग लगेचच पुसता येत नाही. सुरूवातीला ही जांभळी असते आणि नंतर काळी पडते.ही शाई ‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखली जाते.ही शाई केवळ भारतातच वापरली जात नाही तर जगातील इतर देशांतही मतदानानंतर शाईने खूण करणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे जगातील बहुतांश देशांमध्ये ही शाई भारतातूनच जाते.
 
कुठे आणि कोण बनवतं ही शाई?
जर जगभरातले अनेक देश भारतातूनच ही शाई घेतात, तर मग आपल्या इथे ही शाई नेमकी कुठे बनवली जाते?ही शाई भारतात दोन ठिकाणी बनते- हैदराबादमधल्या रायुडू लॅबोरेटरीमध्ये आणि म्हैसूरमधील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीमध्ये.म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीने बनवलेली शाई निवडणूक आयोग देशातील बहुतांशी निवडणुकींसाठी वापरतो. रायुडू लॅबोरेटरीमध्ये बनलेली शाई जगातील दुसऱ्या देशांमध्ये वापरली जाते. जगातील जवळपास 90 देशांमध्ये या शाईचा वापर होतो. त्यापैकी 30 देशांमध्ये म्हैसूर पेंट्स आणि वॉर्निश लिमिटेड शाई पाठवते.सुरुवातीला ही शाई छोट्या बाटल्यांमध्ये भरून निर्यात केली जायची.
 
रायुडू लॅबोरेटरीचे सीईओ शशांक रायुडू यांच्या मते आता तंत्रज्ञान बदललं आहे. 2014 नंतर या पुसल्या न जाणाऱ्या शाईने बनवलेले मार्करच निर्यात केले जाऊ लागले आहेत.या शाईचा उपयोग हा पल्स पोलिओ कार्यक्रमातही केला जातो. ज्या मुलांना पोलिओची लस दिली जाते, त्यांच्या बोटावरही या शाईने खूण केली जाते.
 
ही शाई काम कसं करते?
मतदान केल्यानंतर जांभळ्या रंगाची ही शाई तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाते.या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट केमिकलचं प्रमाण 10 ते 18 टक्के असतं.जेव्हा निवडणूक अधिकारी बोटावर ही शाई लावतो, तेव्हा आपल्या शरीरातील मीठासोबत प्रक्रिया होऊन सिल्व्हर क्लोराइड बनतं.सिल्व्हर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही, आपल्या त्वचेवर त्याची खूण राहते.बोटावर लावल्यानंतर अगदी सेकंदातच त्याची खूण उमटते आणि 40 सेकंदातच ती पूर्णपणे सुकते. विशेष म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग काळा होतो. तुम्ही कितीही साबण, पावडर किंवा तेल लावा, हा डाग निघत नाही. किमान 72 तास तरी त्वचेवरून या शाईचा डाग काढता येत नाही.
 
केव्हापासून वापर होत आहे?
या शाईचा वापर 1960 च्या दशकापासून होत आहे.निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत लाखो बाटल्या शाईची ऑर्डर देतो.निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनिसार 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शाईच्या 21 लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ही संख्या वाढली आणि 26 लाखांपर्यंत पोहोचली.
 
वर उल्लेख केल्याप्रमाणे मतदाराच्या बोटावर मतदानानंतर शाई लावली जाते.
 
मार्च 2015 मध्ये निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका आदेशानुसार शाई डाव्या हाताच्या तर्जनीच्या नखापासून बोटाच्या पहिल्या पेरावर ब्रशने लावली जाते.ज्या ब्रशने ही शाई लावली जाते, त्या ब्रशचं उत्पादनही म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेडच करतो.मतदान अधिकारी ईव्हीएम कंट्रोल युनिटचे प्रभारी असतात. कंट्रोल बॅलेटचं बटण दाबण्याआधी मतदाराच्या बोटावर शाईची खूण पूर्णपणे लावण्यात आली आहे की नाही, याची खातरजमा करणं हे त्यांचं काम असतं.
 
मतदाराच्या बोटावर जर आधीच्या शाईची खूण असेल तर मग शाई कुठे लावायची, असाही एक प्रश्न विचारला जातो.या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मार्च 2021 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात दिलं आहे.आयोगाने या पत्रात लिहिलं आहे, “डाव्या हाताच्या तर्जनीवर जर आधीच्या निवडणुकीची शाई असेल आणि त्याची खूण दिसत असेल तर शाई डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मध्यमा किंवा मधल्या बोटावर लावली जावी.”जर मधल्या बोटावरही शाई असेल तर अनामिकेवर शाई लावली जावी. आता होत असलेल्या निवडणुका आणि आधी झालेली निवडणूक यामध्ये दोन महिन्यापेक्षा अधिक अंतर नसावं, असं आयोगाचं म्हणणं आहे.
 
Published By- Priya Dixit