बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : रविवार, 24 मार्च 2024 (12:15 IST)

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना टक्कर देण्यासाठी भाजप 'धक्कातंत्र' वापरणार?

praniti shinde
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालीय.त्यांच्याविरोधात भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. पण पक्षाकडून अजूनही कुणाचं नाव जाहीर करण्यात आलं नाहीये.
 
प्रणिती शिंदे यांना आधी भाजपची ऑफर असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण त्यांनी त्या सगळ्या चर्चांना बाजूला ठेवून गेल्या काही दिवसांपासून मतदार संघाचे दौरे, गावभेटी आणि कॉर्नर बैठका घेत प्रचार सुरू केला होता. प्रणिती यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे.
वडील केंद्रात मंत्री असताना प्रणिती शिंदेंनी 'जाई-जुई' या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम सुरू केलं.
2009 साली प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
 
त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर मध्य इथून विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा प्रणिती यांनी माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा पराभव केला होता. 2014मध्ये भाजपची लाट असताना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवला, तर 2019 मध्ये प्रणिती शिंदेनी आमदारकीची हॅटट्रिक केली.
 
सध्या प्रणिती या राष्ट्रीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य आहेत. तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे.आता 2024मध्ये काँग्रेसने प्रणिती शिंदेना पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने अजूनही उमेदवाराचं नाव जाहीर केले नसले तरी गेल्या दोन लोकसभा निवडणुका पाहता सोलापूर लोकसभेचा पेपर भाजपसाठी सोपा गेला आहे. दोन्हीवेळा भाजपने नवीन उमेदवार देऊनही त्यांना घवघवीत यश मिळालं.
 
दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात दौरे करून जनसंपर्क वाढवल्याचं सांगितलं जातंय.पण 2024 आधी प्रणिती शिंदे क्वचितच आपला विधानसभा मतदारसंघ सोडून बाहेर पडल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा प्रभाव मर्यादित आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.कधीकाळी वडील सुशीलकुमार शिंदेंचं वर्चस्व असलेला सोलापूर मतदारसंघ प्रणिती शिंदे पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणतील का? की लिंगायत आणि पद्मशाली समाज बहुल मतदारसंघ परंपरेप्रमाणे भाजपचीच साथ देणार? हे आपण जाणून घेऊयात.
 
पण त्याआधी या मतदारसंघाचा इतिहास, जातीय समीकरण, मतदारसंघाची रचना, इथल्या विधानसभा मतदारसंघाचं राजकीय बलाबल पाहुयात.
 
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
1952 मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली.
तेव्हापासून अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे.2009मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा राखीव मतदार संघ म्हणून घोषित करण्यात आला.
 
तेव्हा सुशीलकुमार शिंदे निवडून आले. पण 2014च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि त्याठिकाणी भाजपच्या शरद बनसोडे या नवख्या उमेदवाराचा विजय झाला होता.2014 पासून हा मतदारसंघ भाजपकडेच आहे.
 
तिसऱ्यांदा हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप याठिकाणी तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये अनेकजण सध्या खासदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच याठिकाणी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात उशीर होतोय, असं सांगण्यात येत आहे.2014 आणि 2019 मध्येही सोलापूरसाठी उमेदवार शोधण्यासाठी भाजपला धडपड करावी लागली होती.पण भाजप धक्कातंत्र देण्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेवटच्याक्षणी एक हटके नावही पुढे येऊ शकते.
 
सोलापूरची सामाजिक आणि राजकीय गणितं
बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाला लागून आहे. सोलापूर शहरात मराठी, तेलुगू आणि कन्नड मातृभाषा असणारे नागरिक राहतात.
 
"सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते-पाटील यांच्यात अनेकवर्षं एक अलिखित नियम होता. त्यानुसार सुशीलकुमार शिंदे त्यांचा मतदारसंघ आणि सोलापूर शहराचं राजकारण सांभळणार. तर उर्वरीत सोलापूर जिल्ह्याचे राजकारण मोहिते पाटील पाहणार," असं लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा लिंगायत बहुल मतदारसंघ आहे.
 
त्यानंतर पद्मशाली समाज, मुस्लीम अनुसूचित जाती, धनगर समाज यांचा क्रमांक येतो. इथला लिंगायत समाज परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करत आला आहे.2014 साली शरद बनसोडे आणि 2019 मध्ये जयसिद्धेश्वर स्वामींनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्यावेळी लिंगायत समाजाचं एकहाती मतदान हे भाजपला पडलं होतं.
 
पण वंचित बहुजन आघाडीसुद्धा अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर आपला दावा करत आहे.सोलापूर मतदारसंघात 2014च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि 2019ला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता.
 
त्याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता. त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता.पण सध्या प्रकाश आंबेडकर हे INDIA आघाडीमध्ये गेले तर तिथे तिथली मत पुन्हा कॉंग्रेसला मिळतील. दलित मुस्लिम मतांचं विभाजण होणार नाही. MIM जरी वंचितपासून वेगळी झाली असली तरी मविआमध्ये जाण्यासाठी त्यांचेही प्रयत्न चालू आहेत.
 
मतदारसंघातील प्रमुख समस्या
या मतदारसंघाचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित मतदारसंघ आहे.तसंच इथल्या विकासाच्या मुद्द्यांकडे राजकीय नेत्यांची कायम अनास्था दिसून येते.
सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आहे. सोलापूरच्या लोकांची आणि शेतीची तहान भागावी म्हणून हे धरण बांधण्यात आलं. पण अजूनही सोलापूर शहरात आठवड्यातून एक किंवा दोनवेळाच पाईपलाईनद्वारे पाणी येते. उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे शहराला पाणी पुरवलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून समांतर पाईपलाईनचा प्रश्न रखडला आहे. त्याचं काम संथगतीने सुरू आहे.'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी या मतदारसंघाची अवस्था आहे.
दुसरीकडे मोठे उद्योग आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण व्यवस्था नाहीये. सोबत गटातटाचे राजकारण आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत नसल्याचं सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक पत्रकार सांगतात.
 
सोलापूरसाठी भाजपचं धक्कातंत्र?
सोलापूरमधील भाजपचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी खासदार यांना पुन्हा तिकीट मिळणार नाही, हे आता जवळजवळ स्पष्ट झालं आहे.राखीव मतदारसंघात उमेदवार शोधणं भाजपसाठी सतत जिकरीचं काम राहिलं आहे.
 
"2014 आणि 2019मध्ये मोदी लाटेमुळे सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले. पण राखीव जागेवर उमेदवार देताना भाजपला सतत कसरत करावी लागत आहे. अजूनतरी त्यांना सोलापूरसाठी सक्षम उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं पारडं जड असलं तरी त्यांना सर्वपरिचित चेहऱ्याची गरज आहे," असं सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर लोकसभेसाठी अधिक चांगला उमेदवार देण्याचे सूतोवाच केले आहेत.
 
त्यासाठी इतर पक्षातून उमेदवार आयातही केला जाऊ शकतो. किंवा अगदी नवखा उमेदवारही घोषित केला जाऊ शकतो.दुसरीकडे काँग्रेसकडे प्रणिती शिंदे यांच्यासारखा सगळ्यांच्या ओळखीचा चेहरा आहे. पण त्यांचा संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघात म्हणावासा जनसंपर्क नाहीये.
 
स्वत:च्या विधानसभा मतदारसंघाबाहेर त्यांचं कामही दिसून येत नाही. त्यामुळे काँग्रेस असो किंवा भाजप, दोन्ही पक्षांना इथे दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे, असं अरविंद जोशी सांगतात.पक्षबांधणी केली नसल्याने शिंदेंना लोकसभा निवडणूक जड वाटतेय. तर मतदारसंघात ताकद असून सर्वपरिचित उमेदवार न मिळणे हा भाजपसमोरचा प्रश्न आहे. या दरम्यान, भाजपच्या उमेदवारीसाठी काही नावांची चर्चा आहे. यामध्ये राम सातपुते, मिलिंद कांबळे, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची नावे आहेत.
 
राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. सातपुते हे मुळचे बीडचे आहेत. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत अनेक वर्षं काम केलेले नेते, अशी त्यांची ओळख आहे.
 
"पक्षाने आदेश दिला तर आपण सोलापूर लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहोत," असं राम सातपुते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मिलिंद कांबळे हे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे चेअरमन आहेत.तर डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी हे काशीच्या जंगमवाडी मठाच्या जगद्गुरूपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
 
डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांना 2019मध्येही निवडणूक लढवावी यासाठी भाजपकडून विनंती करण्यात आली होती. तसंच त्यांचे संघाचे सरसंघचालक यांच्याशी जवळचे संबंध आहेत.
 
सरतेशेवटी, सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अनेक नावांची चर्चा असल्याने पक्ष शेवटच्या क्षणी धक्कातंत्र वापरू शकतं, असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

Published By- Priya Dixit