गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 मार्च 2024 (10:13 IST)

महाराष्ट्रातील चार विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका का जाहीर केल्या नाहीत?

Election Commission
भारत निवडणूक आयोगाने अठराव्या लोकसभा निवडणुकीची सार्वत्रिक घोषणा करताना हरियाणामधील कर्नाल विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक घोषित केली. परंतु, महाराष्ट्रातील चार विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त असताना तेथे पोटनिवडणुका का जाहीर केल्या नाहीत? असा सवाल ‘निर्भय बनो आंदोलन’च्यावतीने भारत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला  आहे.
 
‘निर्भय बनो आंदोलन’ या चळवळीचे नांदेडमधील सदस्य संदीपकुमार देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी हरियाणामधील कर्नाल विधानसभा पोटनिवडणुकीचा दाखला दिला आहे.
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 12 मार्च रोजी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर, कारंजाचे आमदार राजेंद्र पटणी यांचे निधन झाले आहे. सावनेरचे आमदार सुनील केदार यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. विधानसभेच्या या चारही जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर 2024 मध्ये संपुष्टात येत आहे. मग तरीही महाराष्ट्रातील चार जागांवर पोटनिवडणुका का जाहीर केल्या नाहीत? पोटनिवडणूक घोषित करू नये म्हणून निवडणूक आयोगावर राजकीय दबाव आहे का? असे प्रश्न देशमुख यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विचारले आहेत.

Edited By -Ratnadeep Ranshoor