कॉंग्रेसला आता आमचे महत्त्व कळाले- मुलायम
आम्हाला खिजगणतीत न धरण्याचा कॉंग्रेसचा निर्णय आता त्यांच्या अंगलट आला आहे. आमचे महत्त्व काय आहे ते त्यांना आता समजतेय, अशा शब्दात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी कॉंग्रेसवर टीका केली. लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव व रामविलास पासवान यांनी संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरायला हवे होते, असे विधान पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काल पत्रकार परिषदेत केले होते. त्यावर बोलताना मुलायम यांनी ही टीका केली. ते म्हणाले, आम्ही एकत्र लढायला हवे होते ही जाणीव कॉंग्रेसला झालीय, पण तिला आता फार उशीर झालाय. आम्ही सर्वांनी एकत्र लढावे असे पंतप्रधानांना वाटत होते, तर त्यांनी त्याचवेळी चर्चांमध्ये हस्तक्षेप का केला नाही. त्यांच्याकडे वेळ आणि पर्याय अशा दोन्ही गोष्टी होत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या चौथ्या आघाडीची उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जोरदार हवा झाली असून सर्व विरोधकांना आम्ही पाणी पाजू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.