मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

चौथ्या आघाडीची स्थापना खुर्चीसाठी- सोनिया

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रथमच केंद्रातील सत्तेत भागीदार असलेल्या लालूप्रसाद यादव व रामविलास पासवान यांच्या पक्षांवर थेट तोफ डागत आपण कुणाचीही भीडभाड ठेवत नसल्याचे दाखवून दिले. या नेत्यांनी मुलायमसिंह यांच्यासमवेत स्थापन केलेल्या चौथ्या आघाडीचा उल्लेख करून हे सगळे सत्तेची खुर्ची डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

चौथ्या आघाडीवर अतिशय शेलक्या शब्दांत टीका केली. 'हल्ली आघाड्या स्थापन करण्याची फॅशनच आली आहे. तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि अशा कितीतरी आघाड्या आगामी काळात येतील. या सगळ्या आघाड्या सत्ता डोळ्यासमोर ठेवूनच बांधल्या जातात. बाकी त्यामागे काहीही उद्देश नसतो, अशा शब्दांत त्यांनी चौथ्या आघाडीचे वाभाडे काढले.

याआधीही अशा अनेक आघाड्या स्थापन झाल्या नि नाहिशाही झाल्या. पण यापैकी कोणतीच आघाडी जातीयवाद, गरीबी व दहशतवादाशी लढा देऊ शकली नाही, अशी टीका करून या प्रश्नांविरोधात लढण्याची ताकद दाखविणारी कॉंग्रेससारखी आघाडी तुम्ही कधी पाहिली आहे, काय असा सवालही त्यांनी केला.

'त्यांनी' कॉंग्रेसबरोबर सत्तेत भागिदारीही केली आणि आता टीकाही करताहेत, असे सांगून जेवढे पक्ष तेवढे नेते हल्ली झाले आहेत. पंतप्रधानपदासाठीही तेवढेच उमेदवार निर्माण झाले आहेत, असे त्यांनी पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणार्‍या लालूप्रसाद यादव व रामविलास पासवानांचे नाव न घेता सांगितले.

देश असा चालत नाही, असे सांगून मनमोहनसिंग हेच या पदासाठी योग्य उमेदवार आहेत. त्यांच्याकडे अनुभव व दूरदृष्टी असल्याचे सांगून त्यांनी मनमोहनसिंगांची तरफदारी केली.