शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By वेबदुनिया|

प्रेम एक कोडं

प्रेम म्हणजे आयुष्यातलं हळुवार असं कोडं जमलच तर विश्वासानं अनुभवून बघा थोडं विश्वासाच्या श्वासावरच प्रेमाची बहर फुलते. हृदयाच्या गाभार्‍यात गच्चपणे भरलेलं प्रेमांकुर फुलते. प्रेम असते एक नवा वाटणारा थरार. मृगजळाचा भास आणि आभासांचा करार. 

प्रेम असते आयुष्याला दिव्यत्वाकडे नेणारा एक अनमोल क्षण तो जोडतो असंख्य भावनांची अलवार नाती. आयुष्याच्या कातर क्षणांना. अलवारवेळी नकळतपणे स्वप्नांचा एक संवाद मोहरू लागतो. अलगदपरे कुणाच्यातरी आठवणींची जादू आपलं विश्व बदलवू पाहतेय. तेव्हाच कुठे भावविश्वाच्या पाऊससरी ओथंबून नाचू लागतात. श्रावणातल्या पहिल्या पावसातील मोरांसारख्या...!

हे प्रेम फुलांची भाषा हृदयातून उलगडणारी ती होते तेव्हा राधा विहरातून उलगडणारी सागराची भरती मनामध्ये धडकी भरायला लावते. लावण्याची मुग्ध आरास काजळी डोळ्यांनी टीपाविशी वाटते. आयुष्याच्या पर्वावर संगीताचे कारंजे वेदनेचे शिंतोडेजणू पाहतात. गुढ भावनांची सैल पडणारा अनामिक व्यथा हुरहुरीने झुरते.

आतुर मनांच्या गुंफाणीत तारकांचे रंग भरायला येते. एकेका पाकळीला सुवासाचा मकरंद सुटतो. वसंतातल्या पळसाचे खुळे सौंदर्य फुलते. मनाच्या वेलींवर फुले उमलायला येतात. हळव्या भावनांनी काव्यांचे शब्दही ओठी येतात. प्रेमाच्या महतीची सारीच क्षितीजे आकाशालाही ठेंगणी भासू लागतात. 

प्रेमाच्या अशा नव वळणावर तरुणाईचे दिवस फुलायला लागतात. यातूनच फुलत जातो मनामनामधील संवाद. प्रेमाच्या दिव्यस्वप्नांची कहाणी अशा नाजुक वेळी फुलते. प्रेमाचे फुल म्हणजे आयुष्याच्या वेलीवर फुललेलं एक सुंदर साज. त्याला कसं जपायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र एवढं नक्की, आयुष्यातील सागर वाटेत वादळांचा थरार असतो, तसाच काहीसा प्रकार प्रेमात असतो. तेव्हा या हळव्या प्रितीची बिजे उमलवायला एक परिपूर्ण प्रेमाची संकल्पनाच सावरू शकेल. आशेच्या किरणांनीच दिवसावरचे सावट दूर होते. तेव्हा प्रेमाच्या डावातही अगम्य स्वप्नांचे सोहळे सजविण्यासाठी प्रेमाची खरी पाऊलवाट सोबत करावी.