शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By चंद्रकांत शिंदे|

टाटा, बिर्ला आणि लैला

PR
टाटा बिर्ला म्हटलं 'की लगेच डोळ्यांसमोर दैदिप्यमान श्रीमंती उभी राहते. टाटा आणि बिर्ला नावातच एक जादू आहे. एखादा खिशाने फाटका बढाया मारु लागला की समोरचा लगेच त्याला नामोहरम करण्यासाठी बोलतो... स्वतःला काय टाटा बिर्ला समजतोस की काय? प्रत्येक जण श्रीमंत होण्याची मनिषा उरी बाळगून असतो. श्रीमंत होण्यासाठी माणसं कशी धडपडतात आणि माणुसकी कशी विसरतात याचे आगळे-वेगळे कथानक घेऊन सिने टोल ईन्टा प्रस्तुत टाटा, बिर्ला आणि लैला चित्रपट घेऊन येत आहेत. ९ जुलैला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाची निर्मिती जी. सी. गुप्ता आणि सुभाष शर्मा यांनी केली असून यात भरत जाधव आणि अशोक सराफ वेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहेत. राजू पार्सेकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाची कथा दोन अशा मामा-भाचे असलेल्या चोरांची आहे जे श्रीमंत होण्यासाठी करामाती करीत असतात आणि यासाठी ते आपसी नावेही टाटा आणि बिर्ला ठेवतात. लक्ष्मी इंडस्ट्रीजचे मालक आणि शहरातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती भोलाशंकर कोल्हे यांच्या एकुलत्या एका मुलीला लक्ष्मीला मारण्याची सुपारी भाई दुबईकरला दिली जाते. या संधीचा फायदा घेण्यासाठी टाटा, बिर्ला लक्ष्मीच्या घरात प्रवेश मिळवतात. ठाटा, बिर्ला लक्ष्मीला मारण्यासाठी तिच्या घरात घुसतात खरे पण टाटा लक्ष्मीच्या प्रेमात पडतो आणि सुरु होतो न सुटणारा भावनिक गुंता. त्यातच साई कसाई उर्फ लैला याने सुध्दा लक्ष्मीला मारण्याचा कट रचला आहे. लक्ष्मी ही लक्ष्मी इंडस्ट्रीजची एकुलती एक वारस असून हा सगळा आटापिटा फक्त आणि फक्त तिच्या संपत्तीसाठी केला जातो. पैशासाठी माणूस किती खालच्या थराला जातो हे विनोदाच्या अंगाने दाखवण्याचा एक निर्मळ प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.

अशोक सराफ आणि भरत जाधव यांच्यासोबत शीतल जाधव, मोहन जोशी, उषा नाईक, विजय चव्हाण, विजय गोखले, संजय खापरे, डॉ. विलास उजवणे, रविंद्र बेर्डे, अरुण कदम आणि भारत गणेशपुरे ही कलाकार मंडळीही आहेत. चित्रपटाची कथा अरविंद जगताप यांची असून लेखन सहाय्य दीपक महादेव यादव यांनी केले आहे. गीते अविनाश घोडके यांची असून संगीत नितीन हिवरकर यांनी दिले आहे.