गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र अर्थसंकल्प
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (21:41 IST)

अर्थसंकल्पात कधीही पूर्णत्वास न येऊ शकणा-या घोषणांचा पाऊस- बाळासाहेब थोरात

शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला दिसतोय. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, यामुळे महाराष्ट्रातील जनता हैराण आहे. निवडणुकीतील भाषणात करावयाचे अनेक मुद्दे अर्थसंकल्पात आलेले आहेत. वास्तव आणि सत्याचे भान नसलेला, कधीही पूर्णत्वास न येऊ शकणा-या घोषणांचा अर्थसंकल्पात पाऊस आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.  
 
सरकारचा मानस आहे, प्रस्तावित आहे, इच्छा आहे, भरीव तरतूद, आवश्यक निधी देण्यात येईल अशा गोष्टी अर्थसंकल्पाचा भाग होऊ शकत नाही. लोकप्रिय घोषणा करायच्या मात्र त्यासाठी तरतूद करायची नाही, जसे की सर्क्युलर इकॉनोमिक पार्क उभारण्यात येईल, मराठी भाषा मंडळ स्थापन करण्यात येईल, संतांच्या स्मृती जतन करण्यात येतील, स्मारके उभारण्यात येतील हे निवडणुकीतील भाषणाचे मुद्दे असायला हवेत, असे थोरात म्हणाले.