चिंता हरून शांती देणारा श्री चिंतामणी, थेऊर येथील बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये सुंदर हिरे जडलेले
Maharashtra Tourism : श्री चिंतामणी थेऊर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर गावात असलेले गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक मानले जाते आणि येथील गणपतीला "चिंतामणी" या नावाने ओळखले जाते, ज्याचा अर्थ "चिंता दूर करणारा" असा आहे. श्री चिंतामणी अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती आहे. तसेच ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.
श्री चिंतामणी मंदिर
गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि आसन घातलेली आहे. मूर्तीच्या डोळ्यांत लाल मणी आणि हिरे जडलेले आहे. तसेच मंदिर भव्य आहे, उत्तराभिमुख मुख्य प्रवेशद्वार आणि प्रशस्त सभामंडप आहे. मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया गोसावी यांचे नातू धरणीधर महाराज देव यांनी केली, तर बाह्य लाकडी कक्ष पेशवा माधवराव प्रथम यांनी बांधला.
पौराणिक कथा
राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.
उत्सव-
अंगारकी आणि संकष्टी चतुर्थीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर भक्तांच्या चिंता दूर करणारे आणि मन:शांती देणारे मानले जाते, ज्यामुळे येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते.
जवळची प्रेक्षणीय स्थळे-
भुलेश्वर मंदिर
रामदरा
नारायण महाराज आश्रम
श्री चिंतामणी मंदिर थेऊर जावे कसे?
मुळा-मुठा आणि भीमा नद्यांच्या संगमावर हे मंदिर स्थपित आहे. तसेच थेऊर हे पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर असून पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर आहे. पुणे शहरात गेल्यावर थेऊरला जाण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहे.