1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑगस्ट 2025 (07:30 IST)

ज्ञान व बुद्धीचा अधिपती मोरगावचा मोरेश्वर, महादेवांचा नंदी इथं मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर

Moreshwar Morgaon
Maharashtra Tourism : मोरगावचा मोरेश्वर अष्टविनायकांपैकी पहिले गणपती मंदिर आहे. मोरगावचा मोरेश्वर, ज्याला श्री मयूरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. तसेच हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथे आहे. हे मंदिर कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले असून गणपत्य संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते.
मंदिराची माहिती-
हे मंदिर काळ्या पाषाणापासून बांधलेले आहे आणि बहामनी काळात  त्याची स्थापना झाल्याची नोंद आहे. मोगल आक्रमणांपासून संरक्षणासाठी मंदिराला मशिदीसारखा आकार देण्यात आला आहे. मंदिराला चारही बाजूंनी मनोरे आणि 50 फूट उंच संरक्षक भिंत आहे.तसेच गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहे. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहे.
 
कथा
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली. तसेच सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले. तसेच मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे, जी शंकराच्या मंदिरासाठी नेली जात होती, परंतु रथाचे चाक तुटल्याने ती येथेच स्थापित झाली. मंदिराच्या चार प्रवेशद्वारांवर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगातील गणपतीच्या अवतारांची चित्रे आहे.
 
प्रमुख उत्सव-
माघ महिन्यातील गणेश जयंती आणि भाद्रपदातील गणेश चतुर्थी  यावेळी इथे मोठी जत्रा भरते. विजयादशमी आणि सोमवती अमावास्येला विशेष उत्सव होतात. तसेच  चिंचवड येथील मोरया गोसावींच्या मंदिरातून गणेश चतुर्थी आणि माघ चतुर्थीला पालखी येते.
 
सांस्कृतिक महत्त्व-
मोरगावचा मोरेश्वर अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ आणि समारोप बिंदू आहे. तसेच थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथे पूजेचा वसा घेतला होता. मंदिर परिसरात शमी, मंदार, बेल आणि कल्पवृक्ष आहे, ज्याखाली अनुष्ठान केल्यास इच्छापूर्ती होते अशी श्रद्धा आहे.
 
जवळची प्रेक्षणीय स्थळे-
जेजुरी: खंडोबा मंदिर 
सासवड: संत सोपान महाराज समाधी 
नारायणपूर: एकमुखी दत्त मंदिर, शिवमंदिर, बालाजी मंदिर आणि पुरंदर किल्ला  
 
मोरगावचा मोरेश्वर जावे कसे? 
विमान मार्ग- मोरगावचा मोरेश्वर गणपती दर्शनासाठी जाण्याकरिता सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे विमानतळ आहे. पुणे ते मोरगाव ६८ किमी असून रस्त्यांनी जोडलेले आहे.