शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (08:37 IST)

माळशेज घाट (पावसाळी पर्यटन)

माळशेज घाट सह्याद्री पर्वताच्या नैर्सगिक वैविध्याने नटलेला परिसर पुणे व मुंबईवरून सारख्याच म्हणजे 150 किलोमीटरवर आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा लागून सुट्ट्या आल्यात की माळशेज घाट पर्यटकांनी ओसंडून वाहतो. या घाटाचे सौंदर्यच तसे आहे.
 
सर्वांना मोहवून टाकणारे. उंच पर्वरांगातून निघालेल्या चिंचोळ्या वाटा, खळाळत कोसळणारे धबधबे, लांबच लांब पसरलेला दर्‍यांयांमधील प्रदेश आणि चोहोबाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार रांगांमध्ये पसरलेली टेबल लँड. या टेबल लँडच्या चोहीकडून वारे प्रचंड वेगाने वाहतात.
 
माळशेज घाटात गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे. पर्यावरणं अभ्यासकांची तर ही प्रयोगशाळा आहे. पावसाळ्यात ढगासोबत चालत व दवबिंदूंच्या धुक्यात खोल दर्‍यात कोसळणार्‍या धबधब्यांचा थरार अनुभवणे म्हणजे निव्वळ अप्रतिम.
 
मान्सून संपल्यावर गुलाबी थंडी‍त मोकळ्या आभाळाखाली तळ्याच्या काठी मस्त तंबू ठोकूनं शेकोटी पेटवायची अन रात्रीचं सौंदर्य न्याहाळत, चांदण्यांशी गूजगोष्टी करत रात्र घालवण्याचा कार्यक्रमही भन्नाटच. येथूनच जवळच सात किलोमीटरवर हरिश्चंद्र गड आहे.
 
येथील कोकण कडा गिर्यारोहकांना आव्हान आहे. या कड्याची उची आहे 1424 मीटर. मग पझल पाँईट जवळ करायचा. बघायच आपण जंगला‍त वाट चुकतो की आपल्या ठिकाणावर परत येतो.
 
येथील जैवविविधतेने समृद्ध जंगला‍त अनेक पक्षी आणि प्राणी सुरक्षित वातावरणात शांतपणे वाढतात. त्यांचे निरिक्षण करता येणे शक्य आहे. माळशेज रांगांमध्येच तिसर्‍या शतकातील बौद्ध गुहा आहेत.
 
अष्टविनायकातील ओझर व लेण्याद्री ही ठिकाणे येथून जवळ आहेत. ज्योतिर्लिंग भीमाशंकरही येथून जवळच आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान येथून 35 किलोमीटरवर शिवनेरी आहे. घाटात आल्यास या ठिकाणीही जाता येईल.
 
जाण्याचा मार्ग 
माळशेज घाटात जाण्यासाठी पुणे व मुंबईहून बस आहेत. मित्रांसोबत मौज करत जायचे असेल तर गाडी करून जाणे सोयीस्कर. जवळचे रेल्वे स्टेशन कल्याण आहे.