सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (12:18 IST)

मुंबईच्या कोणत्या भागात किती पाऊस पडतो, हे तुम्हाला माहितीये?

- मयांक भागवत
मुंबईत मान्सूनने धमाकेदार एन्ट्री केली आहे. बुधवार ( 9 जून) सकाळपासूनच संततधार कोसळणाऱ्या पावसाने, मुंबई शहर आणि उपनगरात दमदार हजेरी लावत, मुंबईला झोडपून काढलं.
 
हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णकांत होसाळीकर सांगतात, "सकाळच्या तीन तासातच सांताक्रूझ वेधशाळेत 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली."
 
बुधवारी सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 या सहा तासात सांताक्रूझ वेधशाळेत 164 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मुंबई शहराच्या तुलनेत, उपनगरात नेहमीच जास्त पाऊस पडतो.
 
मुंबईची ही कोणती उपनगरं आहेत? कोणत्या परिसरात सर्वात जास्त पाऊस पडतो? याचं कारण काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
कोणत्या उपनगरात जास्त पाऊस पडतो?
हवामान खात्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मते, कुलाबा वेधशाळेच्या तुलनेत सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या पावसाचं प्रमाण जास्त आहे. डॉ. होसाळीकर पुढे सांगतात, "मुंबईच्या उपनगरांमध्ये शहराच्या तुलनेत गेली अनेक वर्ष जास्त पाउस पडतो."
 
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून मुंबईत जोरदार पाउस झालाय.
 
दहिसर, बोरीवली, मालाड, जोगेश्वरी, विलेपार्ले, भांडुप, विक्रोळी आणि अंधेरी भागात 120 मिलीमीटर पेक्षा पावसाची नोंद करण्यात आलीये. तर, काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.
 
ठाण्यातील नौपाडामध्ये 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर, मध्य मुंबईतील धारावी, दादर, बॉम्बेसेंट्रल आणि सीएसटी भागातही पहिल्या पावसात 120 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला.
 
साल 2020 मध्ये मुंबईत मागील 10 वर्षातील सर्वात जास्त पाऊस नोंदवण्यात आला होता.
 
2020 मध्ये मुंबईतील सर्वाधिक पावसाची नोंद झालेले विभाग,
 
विक्रोळी- 2800 मिलीमीटर
दिंडोशी - 2600 मिलीमीटर
कांदिवली - 2600 मिलीमीटर
बोरीवली - 2400 mm
आणि मुलुंडमध्ये 2400 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती.
मुंबई शहरामध्ये उपनगरांच्या तुलनेत पावसाची नोंद कमी झाली आहे, तर दक्षिण मुंबईच्या वरळी, नरिमन पॉइंट, मलबार हिलमध्ये 1400 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवण्यात आला
 
हवामान शास्त्रज्ञ अक्षय देवरस सांगतात, "मॉन्सूनमध्ये जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी काढली तर, सांताक्रूझ वेधशाळेत कुलाबा वेधशाळेपेक्षा जास्त पावसाची नोंद केली जाते."
 
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत सांताक्रूझ वेधशाळेत 3852 मिलीमीटर, तर कुलाब्यात 3413 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
 
मुंबई हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भुते सांगतात, "भौगोलिक परिस्थितीमुळे उपनगरांच्या डोंगराळ भागात पावसाचं सरासरी प्रमाण जास्त असतं."
 
2019 मध्ये सांताक्रूझमध्ये 3867 मिलीमीटर तर कुलाबामध्ये 2854 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, असं मुंबई महापालिकेचा रिपोर्ट सांगतो.
 
मुंबई उपनगरात पाऊस जास्त पडण्याचं कारण?
हवामान खात्यातील संशोधकांकडून आम्ही मुंबई उपनगरात जास्त पाऊस पडण्याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
हवामान शास्त्रज्ञ अक्षय देवरस, यूकेतील रिडिंग विद्यापिठात पीएचडीचं शिक्षण घेत आहेत. ते म्हणतात, "मॉन्सूनच्या वाऱ्यांमध्ये आर्द्रता असते. हे जमिनीवर राहून चालणार नाही. पाऊस पडण्याची प्रक्रिया होण्यासाठी ते उंचावर जाणं महत्त्वाचं आहे. यात डोंगर किंवा इतर गोष्टींची मदत होते."
 
तज्ज्ञ सांगतात, मुंबईच्या उत्तरेला असलेले डोंगर, हरित पट्टा आणि तलाव या परिसरात जास्त पाऊस पडण्यासाठी कारणीभूत आहेत. याच्या तुलनेत दक्षिण मुंबईत (शहरात) हरित पट्टा अत्यंत कमी आहे.
 
"दक्षिण मुंबईत डोंगर नाहीत, फक्त समुद्र आहे. उपनगरात संजय गांधी नॅशनल पार्क आहे. पश्चिम घाटांसारखे उंच नाहीत, पण, या भागात डोंगर आहेत. तलावांमुळेही उपनगरात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे," असं अक्षय पुढे सांगतात.
 
तज्ज्ञ म्हणतात, वाऱ्यांचाही काही प्रमाणात पावसावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
मुंबई हवामान विभागाचे माजी प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होसाळीकर याची दोन प्रमुख कारणं सांगतात.
 
भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरण्याची शक्यता
सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळा समुद्रकिनाऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांची टोपोग्राफी एक कारण आहे
अक्षय देवसर पुढे म्हणतात, "उपनगरात पाऊस जास्त पडण्याचं एक कारण म्हणजे कमी दाबाचा पट्टा. बऱ्याचवेळा हा पट्टा दक्षिण गुजरातमध्ये दिसून येतो. मुंबई शहराच्या तुलनेत उत्तरमुंबई जवळ असल्याने उपनगरात पाऊस जास्त पडतो."
 
हवामान खात्याने दिला हाय अलर्ट
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. येत्या चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलाय.
 
मुंबई हवामान खात्याच्या शुभांगी भुते म्हणाल्या, "कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे."
 
मुंबईत बुधवारी हाय अलर्ट असून पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट आहे, अशी माहिती त्यांनी पुढे दिली.