मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महाराष्ट्र दिन
Written By वेबदुनिया|

जय महाराष्ट्र!

Maharashtra Song
संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्‍ट्र राज्याची निर्मिती झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग घेतला होता. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आपले बलिदान दिले.
 
 
संयुक्त महाराष्‍ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे या दिवसाला 'सोन्याचा दिवस' असे संबोधले होते. संयुक्त महाराष्‍ट्र राज्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलले होते, की 'महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस आले असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्‍ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे, हे सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावे.`
 
1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस! या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मं‍त्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला यत्किंचितही थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्‍ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो. असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते. 
 
‘माझा महाराष्ट्र हा मला प्राणापेक्षा प्रिय असल्याचे कवीवर्य श्री. कृ. कोल्हटकर यांनी म्हटले होते. तसेच कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितेत म्हणतात की, ''माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा, तिच्यासंगे जागतील मायदेशातील शिळा''. महाराष्‍ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.
 
मुंबईसह संयुक्त महाराष्‍ट्राची मागणी करणार्‍या आंदोलकांवर तत्कालीन मोरारजी देसाई सरकारच्या पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्याच एकूण 106 जणांनी हौतात्म्य पत्करले. त्यांनंतर मराठी भाषिक प्रदेश एकसंध करून संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी व्यासपीठ असावे, यासाठी संयुक्त महाराष्‍ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादी‍अनेक महत्त्वांच्या व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्र निर्मीतीसाठी मोलाचे योगदान दिले. या महान व्यक्तींचे आम्ही सदैव ऋणी राहू!!!
 
महाराष्ट्र चिरायू होवो! जय महाराष्‍ट्र!