21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन म्हणून साजरा केला जातो .महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये 1965 साली हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली .
इतिहास-
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. 21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते.
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले.
सिताराम बनाजी पवार,जोसेफ डेव्हिड पेजारकर,चिमणलाल डी. शेठ,भास्कर नारायण कामतेकर, रामचंद्र सेवाराम, शंकर खोटे, धर्माजी गंगाराम नागवेकर, रामचंद्र लक्ष्मण जाधव, के. जे. झेवियर, पी. एस. जॉन, शरद जी. वाणी, वेदीसिंग, रामचंद्र भाटीया, गंगाराम गुणाजी, गजानन ऊर्फ बंडू गोखले, निवृत्ती विठोबा मोरे, आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर, बालप्पा मुतण्णा कामाठी, धोंडू लक्ष्मण पारडूले, भाऊ सखाराम कदम, यशवंत बाबाजी भगत, गोविंद बाबूराव जोगल, पांडूरंग धोंडू धाडवे, गोपाळ चिमाजी कोरडे, पांडूरंग बाबाजी जाधव, बाबू हरी दाते, अनुप माहावीर, विनायक पांचाळ, सिताराम गणपत म्हादे, सुभाष भिवा बोरकर, गणपत रामा तानकर, सिताराम गयादीन, गोरखनाथ रावजी जगताप, महमद अली, तुळशीराम पुंजाजी बेलसरे, देवाजी सखाराम पाटील, शामलाल जेठानंद, सदाशिव महादेव भोसले, भिकाजी पांडूरंग रंगाटे, वासुदेव सुर्याजी मांजरेकर, भिकाजी बाबू बांबरकर, सखाराम श्रीपत ढमाले, नरेंद्र नारायण प्रधान, शंकर गोपाल कुष्टे, दत्ताराम कृष्णा सावंत, बबन बापू भरगुडे, विष्णू सखाराम बने, सिताराम धोंडू राडये, तुकाराम धोंडू शिंदे, विठ्ठल गंगाराम मोरे, रामा लखन विंदा, एडवीन आमब्रोझ साळवी, बाबा महादू सावंत, वसंत द्वारकानाथ कन्याळकर, विठ्ठल दौलत साळुंखे, रामनाथ पांडूरंग अमृते, परशुराम अंबाजी देसाई, घनश्याम बाबू कोलार, धोंडू रामकृष्ण सुतार, मुनीमजी बलदेव पांडे, मारुती विठोबा म्हस्के, भाऊ कोंडीबा भास्कर, धोंडो राघो पुजारी, ह्रुदयसिंग दारजेसिंग, पांडू माहादू अवरीरकर, शंकर विठोबा राणे, विजयकुमार सदाशिव भडेकर, कृष्णाजी गणू शिंदे, रामचंद्र विठ्ठल चौगुले, धोंडू भागू जाधव, रघुनाथ सखाराम बीनगुडे, काशीनाथ गोविंद चिंदरकर करपैया किरमल देवेंद्र, चुलाराम मुंबराज, बालमोहन, अनंता, गंगाराम विष्णू गुरव, रत्नु गोंदिवरे, सय्यद कासम, भिकाजी दाजी, अनंत गोलतकर, किसन वीरकर, सुखलाल रामलाल बंसकर, पांडूरंग विष्णू वाळके, फुलवरी मगरु, गुलाब कृष्णा खवळे, बाबूराव देवदास पाटील, लक्ष्मण नरहरी थोरात, ठमाबाई विठ्ठल सूर्यभान, गणपत रामा भुते, मुनशी वझीऱ अली,दौलतराम मथुरादास, विठ्ठल नारायण चव्हाण, देवजी शिवन राठोड, रावजीभाई डोसाभाई पटेल होरमसजी करसेटजी, गिरधर हेमचंद लोहार, सत्तू खंडू वाईकर, गणपत श्रीधर जोशी, माधव राजाराम तुरे(बेलदार), मारुती बेन्नाळकर, मधूकर बापू बांदेकर, लक्ष्मण गोविंद गावडे, महादेव बारीगडी, कमलाबाई मोहिते सीताराम दुलाजी घाडीगावकर हे हुतात्मे झाले .
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे, इ.स. 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. 1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
Edited By- Priya Dixit