शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. महाराष्ट्र दिन
Written By वेबदुनिया|

'महाकांतार' ते ' महाराष्ट्र' (१)

-आलोक जत्राटकर

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये 'राष्ट्र' या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात 'राष्ट्रीय' आणि नंतर 'महाराष्ट्र' या नावाने ओळखले जाऊ लागले, असे ह्यू एन त्संग तसेच इतर प्रवाशांच्या नोंदीवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील 'महाराष्ट्री' या शब्दावरुन पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा संबंध महार व रट्टा यांच्याशी लावतात तर काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने-दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

महाराष्ट्रातील नद्या, पर्वत व इतर स्थळांचा रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैद्राबादचा निजाम, इंग्रज इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे तिसर्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्‍ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. श्रीराम व हनुमान यांची भेट पंचवटी (नाशिक) येथे झाली होती. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे आजच्या मुंबईच्या उत्तरेस असून नाला सोपारा या नावाने ओळखले जाते.) प्राचीन, भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपो‍टेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रिस्तपूर्व 230-225 पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरित झाली.) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. 78 मध्ये महाराष्‍ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक आजही रुढ आहे.

वाकाटक (इ.स. 250 - 525) यांच्या राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. इ.स. 75 मध्ये राष्ट्रकुट साम्राज्य महाराष्ट्रावर राज्य करीत होते. इ.स. 753 मध्ये चालुक्यांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर इ.स. 1189 पर्यंत राज्य केले. त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. 13व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. 1347 मध्ये तुघलकांच्या पाडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे 150 वर्षे राज्य केले. 16व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत मुघल साम्राज्याशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीजांचा अंमल होता.