' महाकांतार' ते ' महाराष्ट्र' (२)
- आलोक जत्राटकर
महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्याचे खरे श्रेय जाते ते शिवाजीराजांना. १६२७ मध्ये जन्मलेल्या या व्यक्तीने महाराष्ट्र अस्मिता तयार केली आणि त्याला फुंकर घातली. 1647 मध्ये अवघ्या सतराव्या वर्षी शिवाजीराजेंनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागड जिंकला आणि 17व्या शतकाच्या मध्यास पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजी महाराजांमुळे प्रथमच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्याविरोधात स्वतंत्र मराठा राज्य उदयास आले. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. शिवाजी महारजांचा 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे यांनी औरंगजेबाशी सुमारे 28 वर्षे झुंज दिली. पण अखेरीस औरंगजेबाने संभाजीराजांचे धाकटे बंधू राजाराम यांना दक्षिणेस पिटाळले. राजाराम महाराजांनी 18व्या शतकाच्या सुरवातीला जिंजीच्या किल्ल्याची दुरुस्ती केली. त्यांचे पुतणे शाहूराजे हे 1708 मध्ये मराठी दौलतीच्या गादीवर बसले. या कामी त्यांचे पेशवे (मुख्य मंत्री) बाळाजी विश्वनाथ यांची त्यांना साथ मिळाली. राजारामांची विधवा पत्नी ताराबाई यांच्याशी शाहू राजे यांचे मतभेद होते. त्यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. चार दशकांनंतर 'छत्रपतींच्या' (भोसले राजघराण्याच्या) नावाने राज्य कारभार पाहणार्या पेशव्यांच्या हाती मराठा साम्राज्याची सूत्रे आली. मुघलांना हरवून पेशवे नवे राज्यकर्तें म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य वाढवले. त्यांनी मुघल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांच्या अंमलाखाली प्रगत व्यापार आणि अर्थकारण यांचे जाळे आस्तित्वात आले. मुख्य कार्यालय पुण्यात व शाखा गुजरात, गंगेचे खोरे आणि दक्षिणेपर्यंत वाढल्या. शेतीचा देखील विस्तार झाला. त्याचबरोबर पेशव्यांनी दर्यावर्दी कान्होजी आंग्रे यांना हाताशी धरून कुलाबा व पश्चिम तटावरील इतर बंदरे उदयास आणली. या जहाजांनी मुंबईतील ब्रिटीश, गोव्यातील, वसई दमणमधील पोर्तुगीज यांना काबूत ठेवले. त्याच बरोबर मराठा साम्राज्याच्या बाहेर आपल्या सरदारांना जाहागिरी देऊन त्यांच्यामार्फत आपले स्वामित्व अबाधित ठेवले. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले. पेशव्यांच्या काळात दिल्ली (पानिपत), गुजरात (महेसाणा), मध्यप्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर) व दक्षिणेत तंजावरपर्यंत मराठी साम्राज्यविस्तार झाला. इ.स. 1761 मध्ये पानिपतच्या तिसर्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली याने पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपमा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थांनांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपापले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशव्यांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापुरात गेली तर मुख्य शाखा सातारा येथे राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे वंशज यांनी इ.स. 1708 मध्ये शाहूंचे राज्य अमान्य केले. 19व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले. ब्रिटीश काळ व स्वातंत्र्योत्तर काळ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान थाटल्यानंतर मराठे व ब्रिटीश यांच्यात इ.स. 1777-1818 या कालावधीत तीन युद्धे झाली. इ.स. 1819 मध्ये ब्रिटीशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटीशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटीशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळत होते. आजचे नागपूर, सातारा व कोल्हापूर हे त्या काळात विविध राज्यकर्तांच्या ताब्यात होते. सातारा इ.स. 1848 मध्ये बॉम्बे राज्यात तर नागपूर इ.स. 1853 मध्ये नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामील करण्यात आला. बेरार हे हैद्राबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होते. ब्रिटीशांनी इ.स. 1853 मध्ये बेरार काबीज केले व 1902 मध्ये मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निजामाच्या अंमलखाली राहिला. ब्रिटीशांनी अनेक सामाजिक सुधारण तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या, परंतु त्यांच्या भेदभावी निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटीशांविरूद्ध लढा उभारला. पुढे महात्मा गांधी यांनी हा लढा व्यापक अहिंसात्मक मागनि पुढे नेला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महत्वाचे केंद्र होते.