किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सहमती
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सहमती झाली आहे. शेतकरी कर्जमाफी, सर्वसमावेशक विकास या मुद्दय़ांवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असून, वादग्रस्त मुद्दय़ांना हात घालायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक पार पडणार असून यावेळी सामायिक कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उप-मुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. तसंच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी १४, १४ आणि १२ मंत्रीपदं देण्यावर एकमत झालं असल्याच समजत.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यांच्यावर चर्चा करत तोडगा काढणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिवसेनेची मागणी आणि मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी या दोन गोष्टींवर अद्यापही चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. शक्यतो हे मुद्दे टाळले जावेत यावर तिन्ही पक्षांचा भर आहे.