गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (09:57 IST)

नऊवेळा काँग्रेस खासदार असलेल्या काँग्रेस नेत्याची आमदार मुलगी शिवसेनेत

इगतपुरी मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त आज ठरला. आमदार निर्मला गावित उद्या मंगळवारी दि २० रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोतोषजरी येथे शिवबंधन बांधणार आहेत.
 
नुकतंच निर्मला गावित यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नाशिकमधील इगतपुरी येथे भेट घेतली होती. निर्मला गावित या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची कन्या आहेत. दरम्यान, निर्मला गावित नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे माणिकराव गावित हे गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे आहेत. माणिकराव गावित हे सलग नऊवेळा नंदुरबारचे खासदार म्हणून संसदेत निवडून गेले. दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित यांनी माणिकराव गावित यांचा पराभव करुन दहाव्यांदा लोकसभेत जाण्याचा त्यांचा विक्रम रोखला.
 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. राज्यभरातील विविध नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कालच शिवसेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीकडून यंदा दिंडोरी लोकसभा निवडणूक लढवलेले धनराज महाले यांनी पुन्हा शिवबंधन बांधलं. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, त्यांचा मुलगा आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.