पवार म्हणतात हा नेता राज्य योग्य पद्धतीने सांभाळेल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भविष्यात महाराष्ट्राची धुरा योग्य पद्धतीने सांभाळू शकतात असे सूचक वक्तव्य करून शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची नावे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्य़तीत असताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांचे नाव घेतल्याने उपस्थित नेत्यांना धक्का बसला. यावेळी कन्हैय्या कुमार याला साहित्यरत्न जन्मभूमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. विकास कामे होत नसल्याचे सांगत अनेकांनी पक्षातून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. परंतु सत्ता असो वा नसो काम कशी करू घ्यायची हे जयंत पाटील यांच्याकडून शिकले पाहिजे. जयंत पाटील अधिकाऱ्यांना विश्वास घेऊन त्यांच्याकडून कामे करून घेतात. तशी कामे करता आली पाहिजेत. जयंत पाटील यांच्याप्रमाणे काम केले तर विकासकामे नक्की मंजूर होतात. त्यासाठी सत्तेची गरज नाही असे सांगत शरद पवार यांनी जयंत पाटील यांचे कौतुक केले.