शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (15:25 IST)

ना अजित पवार, ना सुप्रिया सुळे! रोहित होणार शरद पवारांचे राजकीय वारसदार?

बारामती : शरद पवारांचा राजकीय वारसदार (Political Heir of Sharad Pawar) कोण? याची चर्चा अनेक वेळा राजकीय वर्तुळात रंगते. कधी अजित पवार, कधी सुप्रिया सुळे यांचं नाव पवारांचे राजकीय वारसदार म्हणून घेतलं जातं. मात्र शरद पवारांचा नातू रोहित पवार यांचा राष्ट्रवादीमधील वाढता दबदबा पाहता ते पवारांचा राजकीय वारसदार असल्याच्या शक्यता बळावत आहेत.
 
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार नावाच्या धुरंधराचा राजकीय वारसदार कोण, याच्या चर्चा नवीन नाहीत. विधानसभा निकालानंतर आघाडीची पुढीत रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची पवारांच्या बारामतीतील निवास्थानी बैठक झाली. या बैठकीवेळी शरद पवारांनी सर्व कार्यकर्ते, नेते आणि पत्रकारांना बैठकीच्या रुममधून बाहेर जाण्यास सांगितलं. अगदी पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही या बैठकीत स्थान नव्हतं. मात्र या बैठकीला शरद पवार आणि थोरातांव्यतीरिक्त हजर होते ते रोहित पवार.
 
बंद दाराआड झालेल्या आघाडीच्या या बैठकीत अजित पवार यांची हजेरी असणं अपेक्षित होतं. मात्र या बैठकीला अजित पवार अनुपस्थित असताना रोहित पवार यांची उपस्थिती शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण याबबत पुन्हा चर्चा रंगण्यास कारणीभूत ठरली.
 
चार दिवसांपासून नॉट रिचेबल अजित पवार अखेर सापडले!
 
पवार कुटुंबातील अजित पवार, सुप्रिया सुळे हे राजकारणातील प्रस्थापित नेतृत्व. आता पवार कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजेचं रोहित पवार राजकारणात सक्रिय झाले आहेत. रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव केला. एखाद्या विद्यमान मंत्र्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय असेल, विजयानंतर राम शिंदेंची घेतलेली भेट असेल, किंवा राम शिंदेंविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावणं असेल, रोहित पवारांच्या राजकीय प्रगल्भतेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोहित पवारांचा दबदबा वाढत चालला आहे. तडफदार नेतृत्व, शरद पवारांप्रमाणेच भाषण शैली, संयमीपणा आणि साधी राहणी यामुळे तरुणांमध्ये देखील रोहित पवारची क्रेझ वाढत आहे.
 
रोहित पवारांच्या धडाडी वृत्तीमुळेच विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ‘माझं पंतप्रधान होण्याचं अर्धवट राहिलेलं स्वप्न माझा नातू पूर्ण करेल’ असं विधान खुद्द शरद पवारांनी केलं होतं. शरद पवारांनी रोहित पवारवर दाखवलेल्या या विश्वासाने रोहितच्या आई सुनंदा पवार यांना अश्रू अनावर झाले.
 
जनतेत मिसळण्याची शरद पवारांसारखी वृत्ती, दांडगा जनसंपर्क, धडाडी यामुळे रोहित पवार सामान्यांना, कार्यकर्त्यांना आपलेसे वाटू लागले आहेत.
 
रोहित पवार यांचं एकूणच व्यक्तीमत्व, आघाडीसोबत महत्वाच्या बैठकीत रोहितला मिळणारं स्थान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहितचं वाढणार महत्व पाहता शरद पवारांचा राजकीय वारसदार हा रोहित पवारच (Political Heir of Sharad Pawar) असणार अशी अटकळ बांधली जात आहे.