शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (10:26 IST)

कर्जत-जामखेडला आलेले बारामतीचे पार्सल घरी पाठवा मुख्यमंत्र्यांचे मतदारांना आवाहन

‘मावळमध्ये नागरिकांनी हिंमत दाखवली. ताकद दाखवली आणि पार्थबापूला घरी पाठवले...!! कर्जत-जामखेडमध्ये ताकद आहे का? मी तुम्हाला विचारतो...तुम्ही मग या ठिकाणी आलेले रोहितबापूचे पार्सल परत पाठवणार का? बघू या २४ तारखेला मावळवाल्यांमध्ये जास्त ताकद आहे का कर्जत-जामखेडवाल्यांमध्ये जास्त ताकद आहे...!! याचा फैसला होऊन जाऊ द्या, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत-जामखेडवासीयांना केले.
 
कर्जत-जामखेड आणि कोपरगाव येथे महायुतीच्या उमेदवार राज्याचे मंत्री राम शिंदे आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभांमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी शरद पवारांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
 
ते म्हणाले, शरद  पवारांना सगळे नागपूरकर गुंड दिसायला लागले आहेत. आमची केवढी दहशत पसरली आहे, हो. नागपूरच्या माझ्यासारखा साधारण माणसाने पवार साहेबांना एवढे जेरीस आणले आहे की त्यांना सगळे नागपूरकर गुंडच दिसायला लागले. ही वेळ तुमच्या आशीर्वादामुळे आली आहे.’
 
राम शिंदे यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘मला विश्वास आहे. आमचा रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे. हा मोठ्या मोठ्यांना पुरून उरलेला कलाकार माणूस आहे. हा काही हार मानत नाही. आमच्या मुंडे साहेबांच्या नेतृत्वात तयार झालेला माणूस आहे. हा सामान्य गडी नाही. हा गडी असा आहे, कितीही मोठा पहिलवान आला, त्याला चितपट केल्याशिवाय रामाभाऊ सोडतच नाही.’
 
‘सामान्य घरातला मुलगा आपल्या मेहनतीने शिकून प्राध्यापक झाला. आमदार झाला. आणि आज मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचा मंत्री म्हणून उभ्या महाराष्ट्रात त्याने नाव कमावले. अशा सामान्य घरच्या मुलाला लोकांनी नेता बनवले. जेव्हा लोक आपले नेतृत्व निवडतात. तेव्हा येथे कोणीतरी नेतृत्व थोपवतय. पण येथे थोपलेल नेतृत्व नाही. तर येथे घडलेल्या नेतृत्वाच्या म्हणजे रामभाऊंच्या मागेच जनता उभी राहील,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 
 
‘रामभाऊ ज्याच्या पाठीशी अशी जनता आहे, त्याने चिंताच करण्याचे कारण नाही. पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे खोट बोल पण रेटून बोल असे सूरुच आहे. ही लोकशाही आहे. प्रेमाने मते मागा. लोक मते देतील. धमक्या कसल्या देता? आम्हाला मते दिली नाहीत तर उस खरेदी करणार नाही. तुमच्या बापाचा उस आहे काय? त्यांच्या कारख्न्यांनी उस घेतला नाही, तर नवी कारखाने उभे करा. रामभाऊ काळजी करू नका सरकार आपले आहे. धमक्या देणाऱ्यांना शेतकरी गाडल्याशिवाय राहणार नाही. धमक्या द्याल तर लोक घरी पाठवल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा खणखणीत इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
 
मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही लोकशाही धनदांडग्यांची नाही. पैशाच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही. पैशाच्या बळावर निवडणूका जिंकता आल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अदानी, अंबांनीच हेच फक्त लोकसभेत, विधानसभेत दिसले असते. ही पैशाच्या भरवशावर निवडणूक नसते. ही निवडणूक जनतेमध्ये कोण असतो, त्याच्या भरवशावर असते. देशात पूर्वी राजा हा राणीच्या पोटी जन्मला यायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली. त्यामुळे आता राजा मताच्या पेटीतून निवडून येतो. सामान्यांचा राजा, सामान्यांचा सेवक रामभाऊ शिंदे यांना तुम्ही निवडून द्यावे.’
 
कोपरगावच्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, ‘निळवंडे प्रकल्पाकरता सरकारने पैसा दिला. राधाकृष्ण विखे पाटील आणि स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. आपण कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविला. पण काही लोकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. कोणत्याही धरणातले १५ टक्के पाणी कायद्यानुसार पिण्याकरता राखीव ठेवावे लागते. त्या राखीव पाण्यातूनच कोपरगावाला पाणी दिले. शेतकऱ्याच्या पाण्याचा आपण थेंब देखील काढला नाही. पण विरोधी उमेदवारांनी लोकांना भडकवले. कोर्टात जायला लावले. पण आता आम्ही ठरवले आहे, , वरची धरणे, दरवर्षी कमी पाऊस पडला की मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नगर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, असा संघर्ष तयार होतो. आता हा संघर्ष संपवला पाहिजे. 
 
गोदावरीच्या खोऱ्यातील तूट भरून काढली पाहिजे. पश्चिम वाहिन्यांनचे नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारे १६८ टीएमसी पाणी उचलून टनेल्सच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणून नगर, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे भांडण कायमचे संपेल. शेतकरी सुजलाम सुफलाम होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.