सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : गुरूवार, 14 जानेवारी 2021 (15:05 IST)

मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू ....!

नवीन वर्षाची सुरुवात झाली, बघता बघता मकरसंक्रांत आली. यंदा काही हळदीकुंकू ची लगबग नाही, की तिळगुळाची गोडी नाही.
आमचे लहानपणी आई कित्तीतरी तिळगुळाचे लाडु, नाना विध आकाराच्या तिळगुळाच्या वड्या, हलवा घरी करत असे.आम्ही तर त्यावर मस्त ताव मारत असू!
सकाळी आईच "सुगड्याच वाण"द्यायची गडबड असायची, त्यामुळे घरात, वाटण्या च्या शेंगा, बोर घरात आणली जायची.आई बरोबर आम्ही ही मिरवत असू.
मग रथसप्तमी पर्यंत एखादा दिवस ठरवून आमचे घरी पण हळदीकुंकू चा कार्यक्रम असे.सकाळी आई कॉलोनी मध्ये सगळ्याकडे पाठवायची बोलावणी करायला. मी अगदी धावतच सगळ्यादूर जात असे.
दुपारी आई चिवडा, वड्या असें काहीतरी करून ठेवीत असें, घरी जे तिळगुळ घेऊन येतील त्यांचे करीता.
घरातले पडदे बदलायचे, चादरी, कव्हर बदलले जायचे, सुंदर रांगोळी काढली जायची. मी थोडी मोठी होईस्तोवर आई काढायची नंतर ते काम माझ्याकडे परमनंट आले. पण त्यातही मजा यायची.
संध्याकाळी दारावर "फुलांची वेणी"वाला येत असें कधी कधी !,खूप हौसेनं ती वेणी घेऊन केसांत माळणे मला खुप आवडत असे.
हळदीकुंकू अत्यन्त साध्या पद्धतीने होतं होत.खाणे पिणे वगैरे जास्तीचे प्रकार नव्हतेच.कारण साधारण ३०/४० बायका येत होत्या आणि त्याच्या बरोबर त्यांची चिल्ल -पिल्लं पण येत होते!गप्पा टप्पा मारत, हास्य विनोदात दिवस पार पडायचा!
रोजचं ३/४ घरचं बोलावणं असायचाच, आम्ही एका पाटीवर पेन्सिलीने लिहून ठेवायचो, कारण मग विसरलो तर आई रागवायची न !
कधी असें दहा पंधरा दिवस संध्याकाळ मस्त जायची आमची.
संक्रांतीच्या दिवशी भाऊ गच्चीवर पतंग उडवीत असायचे, तेव्हा त्यांच्या मागे मागे लुडबुड करीत चक्री पकडत आमची हजेरी लागायची.तत्पूर्वी त्याच्या मांज्या घोटण्या च्या भयंकर प्रकारात पण मदत करावी लागायची!
पाच दहा पैशात बरीच मोठी पतंग मिळत असे, त्याची नावं पण मस्त होती, आखेदार, खडा सबल , मुचकडा, गोलेदार, चांददार असें गमतीदार अनेक नाव असायची.
मला पण छान पतंग उडवीता यायची.संध्याकाळी मुक्काम गच्चीवर अंधार पडेपर्यंत असायचा आणि नंतर मग आई बरोबर हळदीकुंकू ....!
तिळगुळ नातेवाईकांकडे घेऊन जाणे, हाही एक प्रकार असायचा, तेंव्हा सुट्टी असली की आई बरोबर तिकडे पण आम्ही जात असू. थोडक्यात काय पंधरा दिवस कसें भुर्रर्र कन उडून जायचे पतंगी सारखे हलकं होऊन !......
...अश्विनी थत्ते.