संक्रांतीचा शुभ्रोत्सव
-किरण जोशी
|
हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा प्रामुख्याने ब्राह्मण समाजामध्ये होती. पण, आता सर्वच मराठी घरांमध्ये हलव्याच्या दागिन्यांनी सण साजरा केला जातोय. एवढेच नव्हे तर परप्रांतातील मराठी लोकही तेवढ्याच उत्साहात हलव्यांच्या दागिन्यांची प्रथा जोपासत आहेत. त्यांच्यासाठी परप्रांतीय लोक दागिने घडवत आहेत, हे विशेष.
| |
वरकरणी आकर्षक वाटणारे हे दागिने बनविण्याचे काम अत्यंत कठीण आहे. काटेरी हलवा तयार केल्यानंतर त्याला बारीक छिद्र पाडले जाते आणि ते रंगीबेरंगी दो-यामध्ये ओवले जाते. त्यामध्ये क्रेप कागदाची लाल हिरव्या रंगाची फुले-पाने चिकटवली जातात. हलव्याचा चुरा होऊ नये यासाठी हे काम अत्यंत नाजूकपणे करावे लागते. दागिने अधिक आकर्षक दिसण्यासाठी हलव्याला लाल, पिवळा, निळा असे विविध रंग दिला जातो. याचप्रमाणे किरीट, बाजूबंद व इतर दागिने घडविले जातात. काळ्या रंगाच्या कपड्यांवर हे दागिने परिधान केले जातात. हिंदू संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जात असला तरी संक्रातीच्या दिवशी काळे कपडे घालण्याची परंपरा आहे. काळ्या रंगावर पांढरेशुभ्र हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात.
| |
