मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (16:13 IST)

भारतातील अन्न भेसळ, विष मुक्त व्हावे - गावठी बियाणे संग्राहक राहीबाई पोपेरे

अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र)- "प्रत्येक व्यक्ती आज जे अन्न ग्रहण करीत आहे ते सर्व संंकरित व भेसळयुक्त आहे. प्रत्येकाच्या ताटात रसायनांनी युक्त भाज्या आहेत. अशा अन्नामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. आजारांपासून वाचायचे असेल तर जास्तीत-जास्त गावठी-गावरान बियाणे पेरणीसाठी वापरले पाहिजे. प्रत्येकाच्या ताटातील विष व भेसळयुक्त अन्न दूर झाले पाहिजे" असे प्रतिपादन गावठी बियाण्यांच्या संग्राहक राहीबाई पोपेरे यांनी केले. 
 
मंगळग्रह मंदिरात दर्शनानंतर झालेल्या चर्चेेत त्या बोलत होत्या.अहमदनगर जिल्ह्यातील कुंभाळणे येथे बीजमाता म्हणून राहीबाई ओळखल्या जातात. केंद्र सरकारने त्यांंना पद्मश्री सन्मान बहाल केला आहे. अशा प्रकारे नारीशक्तीच सन्मान ही त्यांच्या आजवरच्या कार्याची पावती आहे.राहीबाई आज अमळनेर येथे शेेतकरी महिला मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन घेतले. 
 
चर्चेदरम्यान त्या पुढे म्हणाल्या, "मंगळ देवाच्या आशीर्वादानेच माझी वाटचाल सुरू आहे. भूमाता ही माझी देवी. रेती ही आई. तर निसर्ग हे माझे गुरु आहे. त्यांच्या सानिध्यात काम सुरू आहे. हे काम करीत असताना माहेरात आल्याची जाणीव मला होत असते. समाजात चांगले काम करण्याची इच्छा होती. मात्र परिस्थिती गरिबीची होती. वयाच्या १२ व्या वर्षी लग्न झाले. प्रवास खडतर होता.
 
मन शांत बसत नव्हते. औपचारिक शिक्षण नाही, पण लहानपणापासून शेतीची आवड, वडिलांनी शेतीचे ज्ञान दिले होते. मी अशा दुर्गम भागात राहत होते, जिथे पाणी नाही. दवाखान्यासाठी वीस किलोमीटर पायी जावे लागत होते. माझे काम सुरू असताना नेहमी विरोध होत होता. मी गप्प बसले, यातच नातू आजारी पडला. दीड लाख रुपये खर्च आला. उपचारासाठी पैसे नव्हते. ही समस्या संकरीत आणि रसायन युक्त आहारामुळे होत असल्याचे मी सांगत होते. अखेरीस आमच्या घरात गावरान वाणांचा आहारात समावेश केला. तसे आजार दूर होऊ लागले." 
 
राहिबाई पुढे म्हणाल्या, "माझ्या सांगण्यावर अगोदर लोक हसत होते. मी मात्र माझे काम करीत राहिले. भाजीपाल्यांसह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. आतापर्यंत ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहेत. सध्या तीन हजार महिलांसह मी काम करते आहे. महिलांनी स्वबळावर उभे राहत शेतात वेगवेगळ्या पिकांचे थोड्या प्रमाणावर उत्पादन घेतले पाहिजे. शेतीशी निगडित जोडधंदा देखील केला पाहिजे"
 
राहिबाईंनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या कार्याचा गौरव करीत म्हटले, "संंस्था खूप चांगले काम करीत आहे. येथील मंदिर परिसर निसर्गाच्या सानिध्यात वसला आहे. सर्व सेवेकरी चांगले काम करीत आहेत. हे काम असेच निरंतर सुरू राहून, येथील स्वरूप वाढत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना."