शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (08:02 IST)

मराठा आरक्षण मुद्द्यावर सर्वांनी एकत्र यावे : राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील सर्व संघटनांनी, सर्व नेत्यांनी एकत्रित यावे असे आवाहन भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तसेच खासदार संभाजी राजे भोसले यांनाही एक व्यासपीठावर येण्याची विनंती करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले .मराठा आरक्षणाच्या मुददयावर आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. 
 
यावेळी विखे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुददयावर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रदद केल्यानंतर समाजबांधवांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी कशा पध्दतीने पुढे जायला हवं याबाबत सर्वांचे मत जाणून घेत आहे. आज दिंडोरीत अनेकांनी आपले मत मांडले असून सर्वांची भावना ही आरक्षण मिळावे हे आहे. या बैठकीला सर्वपक्षीय समाज नेत्यांना व संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. मराठा आरक्षणाची लढाई जिकांयची असेल तर सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावे. सामुहिक प्रयत्नांनी हा प्रश्न सुटू शकेल.न्यायालयात आरक्षण टिकविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले खंडपीठातील काही सदस्य हे आरक्षण विरोधात होते. त्याबाबत सरकारने तक्रार करत खंडपीठ बदलण्याची मागणी करायला हवी होती.  सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही तर यांचेकडून काय अपेक्षा ठेवायच्या असा सवाल करत सुप्रीम कोर्टात फेर याचिका दाखल करणार आहे. तसेच राज्यातील सर्व मराठा खासदार आमदार यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.