मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By

आता मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर पाहायला मिळणार वाचा सविस्तर

Maratha Reservation
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने निजामकालीन पुरावे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेला प्रतिसाद खूपच कमी मिळत आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत या महिनाभरात केवळ ८० कुणबी प्रमाणपत्रांचेच वाटप होऊ शकले. त्यामुळेच राज्य सरकारच्या यंत्रणेने संशोधन करून मिळवलेले पुरावे संकेतस्थळावर टाकण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत. त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र काढणे सोपे जाणार आहे.

कुणबी जात प्रमाणपत्र घेण्यासाठी कशाप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, याचा आढावा सामान्य प्रशासन विभागाने घेतला. त्यावेळी केवळ मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून ७० ते ८० प्रमाणपत्रे दिली गेली असल्याचे दिसून आले. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र संकेतस्थळ येत्या आठवडाभरातच सुरु केले जाणार आहे. दिवाळीनिमित्त सुट्या असल्या तरी हे संकेतस्थळ तातडीने सुरु करण्याचे आदेश विभागाने ‘एनआयसी’ला दिले. आपल्या कुटुंबाची ‘कुणबी’ अशी नोंद आहे का, हे तपासण्यासाठी नाव, गाव अशी किरकोळ माहिती टाकून नोंद तपासता येणार आहे.

कुणबी म्हणून नोंद असेल तर संबंधित पुराव्याच्या आधारे अर्ज करता येणार आहे. मराठवाड्यात नोंदणी तपासण्याचे काम सुरु असून आतापर्यंत २२, ९२९ नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातील नोंदणी तपासण्याचे काम ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असून एक कोटी ९१ लाख नोंदी तपासण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील मराठा-कुणबी प्रमाणपत्राचे पुरावे उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ या आठवड्यात सुरु केले जाणार असले तरी पुरावे संकेतस्थळावर टाकण्यासाठी काही दिवस अजून लागणार आहेत. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत हे पुरावे अपलोड करण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ज्याप्रमाणे सातबाराविषयीची माहिती किंवा शेतीच्या नोंदीची माहिती ऑनलाइन उपलब्ध होते; त्याच धर्तीवर हे काम करण्याची सूचना ‘एनआयसी’ला करण्यात आली आहे. अशा प्रकारे हे पुरावे उपलब्ध करून दिल्यास लोकांना त्यांची नोंद ‘कुणबी’ म्हणून आहे किंवा नाही हे स्वत: तपासता येणार आहे. सरकारी हस्तक्षेपदेखील कमी होणार असल्याने कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी दिली.

वेबसाईटवर उपलब्ध होणारे हे आहेत पुरावे
-महसूली अभिलेख : खासरा पत्रक, कुळ नोंदवही
-जन्म-मृत्यू रजिस्टर अभिलेख
-शैक्षणिक अभिलेख
-राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख
-कारागृह विभागाचे अभिलेख
-पोलिस विभागाचे अभिलेख
-सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील अभिलेख : खरेदीखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, मृत्यूपत्रक, तडजोडपत्रक
-भूमीअभिलेख विभागाचे अभिलेख, पक्काबुक, शेतवारपत्रक, वसुली बुक
-माजी सैनिकांच्या नोंदी
-जिल्हा वक्फ अधिका-यांकडील अभिलेख
-शासकीय कर्मचा-यांच्या सेवा तपशीलाबाबतचे अभिलेख. १९६७ पूर्वीच्या कर्मचा-यांच्या सेवा नोंदी
-जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील अभिलेख