शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2023 (10:39 IST)

मराठा आरक्षण : छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदची हाक, मुंबईतही आंदोलनाचा इशारा

maratha aarakshan
जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरील पोलीस लाठीमाराचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत.
राज्यातील काही शहरांत मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) बंदच आवाहन केलं आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रामुख्याने समावेश आहे.
 
तसंच, राज्यभर स्थानिक पातळीवरही निषेध नोंदवण्यासाठी लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
 
दुसरीकडे, राजकीय नेते अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेत आहेत.
 
शनिवारी (2 सप्टेंबर) आमदार रोहित पवार, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जखमी आंदोलकांची भेट घेतली आणि आंदोलकांशी संवादही साधला.
 
शुक्रवारी (1 सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. यात आंदोलक आणि पोलीस दोघेही जखमी झाले आहेत.
 
सोमवारी (4 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर बंद ठेवण्याचं आवाहन मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी केलं आहे.
 
"सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान शहर बंद ठेवण्यासाठी सहकार्य करावं. आम्हाला कोणतीही तोडफोड करायची नाही. आम्हाला शांततेत हा बंद पार पाडायचा आहे," असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
 
त्यासोबत देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि दादर परिसरात मराठा आरक्षण आंदोलन पदाधिकाऱ्यांकडून निषेध आंदोलन करण्यात येणार असल्यांच सांगण्यात येत आहे.
 
कोणत्या नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली?
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्यानंतर सगळ्यात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तिथं भेट दिली.
 
जखमी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार म्हणाले, “पोलिसांनी लाठीचार्ज करताना महिला आहेत का पुरुष आहेत ते बघितले नाही. वयोवृध्द नागरिकांना आणि लहान मुलांनाही मारहाण केली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही मारहाण झाली. तसंच पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला.”
 
त्यानंतर छत्रपती संभाजीराजे, शरद पवार, उदयनराजे आणि जयंत पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी त्याठिकाणी आंदोलकांना संबोधितही केलं.
 
शनिवारी (2 सप्टेंबर) शरद पवार आणि उदयनराजे एकाच मंचावर दिसले.
 
“आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं. जखमींच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी. घडलेल्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी,” असं उदयनराजे म्हणाले
 
मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे. आधीच आरक्षणाची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे होती. आता मुख्यमंत्र्यांनी आंदोलंकाशी चर्चा करावी आणि योग्य मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली.
 
उदयनराजे यांनी लाठीहल्ल्याचा निषेध केला असला तरी यापुढे शांततेत आंदोलन करावं असं आवाहनही केलं आहे.
 
जालन्यात घडलेली घटना गंभीर आहे. मुंबईवरून आदेश आल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
 
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर शरद पवार येथे दाखल झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
 
ते म्हणाले, “जालन्यात सरकारकडून बळाचा गैरवापर करण्यात आला आहे. निष्पाप नागरिकांना चुकीची वागणूक देण्यात आली. लहान मुले, महिला यांना न पाहता लाठीमार केला गेला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन लवकर तोडगा काढावा.”
 
शनिवारी रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
 
"महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं होतं. पण आम्ही कधीच आंदोलकांना लाठीमार केला नव्हता. सध्याचं सरकार हे निर्घृण सरकार आहे. तुम्ही कुणावर गोळ्या चालवत आहात. लोकांच्या केसाला धक्का जरी लागला तरी अख्खा महाराष्ट्र इथं आणून उभा करीन", असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
 
दगडफेक-जाळपोळीचे प्रकार
अंतरवली परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पण शनिवारी काही भागांतून दगडफेक जाळपोळीचे प्रकार समोर आले.
 
जालन्यातल्या अंबड चौफुली इथे आज दुपारी आंदोलकांनी दगडफेक केली. काही गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.
 
रस्त्यावर दगडांचा खच साचलेला दिसत आहे. जाळपोळ झालेल्या गाड्या विझवण्याचे काम अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत.
 
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड फोडल्या आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
अंतरवाली सराटी गावात नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने अंतरवली येथे त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता.
 
या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते.
 
उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला.
 
तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.
 
घटनेची उच्चस्तरीय चौकशी - एकनाथ शिंदे
जालन्यातील लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
 
ते म्हणाले, "झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून मी माहिती घेतली. मनोज जरांगे पाटील या उपोषणकर्त्यासोबत मी स्वतः परवा बोललो होतो. त्यांची जी भूमिका होती, त्याबाबत मी संबंधितांना सूचना दिल्या होत्या. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुद्धा याबाबत वारंवार बैठक घेत आहेत.
 
मी मनोजची तब्येत बिघडत चालल्याने त्याला उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या मागणीवर काम सुरू आहे, असं त्याला सांगितलं. मला मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती खालावलेली असल्याने मनोजला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आज पोलीस गेले असताना हा प्रकार घडला आहे. मात्र, झालेला प्रकार दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असंही शिंदे यांनी म्हटलं.
 


Published By- Priya Dixit