सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By

मराठा मोर्चेच्या वेळेस मुंबईत काय घडत होते?

ऑगस्ट क्रांती दिनाच्या पाश्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे भगवे वादळ बुधवारी मुंबईत थडकले. हातात भगवे झेंडे, डोक्‍यावर भगवी टोपी, गळ्यात भगवे उपरणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेली भगवे टी शर्ट घातलेले लाखो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने मुंबईतील वातावरण अक्षरश: भगवेमय झाले होते.

कोणतीही घोषण न देता शांततेने निघालेल्या या मोर्चाने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. “न भूतो न भविष्यती’ याची प्रचिती देणाऱ्या या मोर्चाने गर्दीचा उच्चांक मोडला. मराठा समाजाच्या या अभूतपूर्व मोर्चामुळे दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक काही काळ मंदावली होती. मोर्चाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाच मुलींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या मागणीचे निवेदन दिले. सरकारच्यावतीने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिनिधीत्व करून ही भेट घडवून आणली.
 
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्यावर्षभरात राज्यभरातून 57 मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजासाठी ठोस निर्णय घ्या, असा इशारा या मोर्चातून सरकारला देण्यात आला होता. पण सरकारने कोणतीच भूमिका घेतली नसल्याने मुंबईत आज मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण आदी भागातून मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. रात्रीपासूनच मराठा बांधव नवी मुंबई, ठाणे परिसरात मुक्काम ठोकला होता. तर काहींनी लांब पल्ल्याच्या गाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटावर रात्रीचा मुक्काम केला होता.

मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांच्या संख्येचा अंदाज पाहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला होता. मोर्चामुळे काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे मोर्चाच्या निमित्ताने दक्षिण मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर लोकलही भरभरून मराठा बांधव मोर्चाच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे नोकरदारवर्गांलाही गर्दीचा सामना करावा लागला.
 
सकाळी 11 वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित झाला. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला होता. आझाद मैदान येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पाच मुलींनी भाषणाच्या माध्यमातून मराठा समाजाची भूमिका स्पष्ट केली. मोर्चाच्या अग्रभागी मुली आणि महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होत्या. या मोर्चामध्ये सर्वच राजकिय पक्षाचे नेते, आमदार सहभागी झाले होते. पण प्रथेप्रमाणे या मोर्चातही विविध पक्षांच्या नेत्यांना सकल मराठा मोर्चाच्या नेतृत्व करण्यापासून चार हात लांबच ठेवले होते. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मोर्चात सामील होण्यास विरोध करणे अथवा आझाद मैदानावर निलेश व नितेश राणे यांना मंचावर येण्यापासून अडवणे अशा तुरळक घटना वगळता, आतापर्यंत झालेल्या 57 मूक मोर्चांप्रमाणे हा मुंबईतील 58वा मोर्चाही शांततेत आणि शिस्तीत पार पडला. मोर्चाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था चोख बजावली होती. काही भागात उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोऱ्यावरुन पोलीस पाहणी करीत होते.
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे…
 
भगवे झेंडे, भगवे उपरणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या भगव्या टी शर्ट घालून सहभागी झालेले लाखो मराठी बांधव सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शांततेने सुरु असलेल्या या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज अवतरले. घोड्यावर स्वार झालेले महाराज आणि त्यांच्या सोबत असलेल्या मावळे हे मोर्चाचे खरे आकर्षण ठरले. अनेकजणांची महाराजांसोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला मोठा झेंडा उभारण्यात आला होता. मोर्चेकरांसाठी हा सेल्फी पॉईंटच ठरला. अनेकजण या झेंड्याखाली उभे राहून स्वतःचे व ग्रुपचे मोबाईलने फोटो काढण्यात मग्न होते.