मराठा क्रांती मोर्चाकडून मशाल रथयात्रेचे आयोजन
मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चाकडून औरंगाबाद ते मुंबईतील आझाद मैदान अशी मशाल रथयात्रा असेल. येत्या 28 तारखेला ही मशाल रथयात्रा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने कूच करेल. कोपर्डी आणि शिवनेरी किल्ल्याच्या मार्गाने ही रथयात्रा मार्गक्रमण करेल, असे सांगितले जात आहे. मात्र, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने राज्य सरकार या रथयात्रेला परवानगी नाकारण्याची शक्यता अधिक आहे.
यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती.
तत्पूर्वी सोमवारी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणांसंदर्भात वक्तव्य केले. योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.