शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (16:04 IST)

मराठा आरक्षण, वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. कोर्टाने याबाबतची याचिका फेटाळून लावत 2020-21 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. इतकंच नाही तर मराठा आरक्षणांतर्गत झालेले प्रवेशही रद्द करण्याची याचिका कोर्टाने तूर्तास फेटाळली. 
 
वैद्यकीय आणि दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना 2020-21 या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणानुसार प्रवेश दिला जाईल. हे सर्व प्रवेश मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णयाच्या अधीन असतील, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.
 
याबाबत बोलताना मराठा आरक्षण समर्थक विनोद पाटील म्हणाले, “पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. त्याचा फायदा वैद्यकीय प्रवेशासाठी जे मराठा विद्यार्थी पात्र आहेत, त्यांना होईल.”
 
यापूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मे 2019 मध्ये निर्णय देताना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा निर्णय दिला होता. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.