मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

गणपती आरती संग्रह भाग 7

तू सुखकर्ता तु दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी ।
गणपती बाप्पा मोरया ॥ धृ ॥ १ ॥
 
तू सकलांचा भाग्य विधाता । तूं विद्येचा स्वामीदाता ।
ज्ञानदीप उजळुनी आमुच्या निववी नैराश्याला ॥ २ ॥
 
तू माता तू पिता जगी या । ज्ञाता तू सर्वस्व जगी या ॥
पामर मी स्वर उणे भासती । तुझी आरती गाया ॥ ३ ॥
 
मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धि विनायक ।
तूझीया द्वारे आज पातली । ये इच्छित मज द्याया ॥ ४ ॥
 
****************************
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ।
मंगलमूर्ति श्री गणराया ।
आधी वंदूं तुज मोरया ॥ १ ॥
 
सिंदुर-चर्चित धवळी अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ॥
बघता मानस होते दंग ।
जीव जडला चरणीं तुझिया ॥ २ ॥
 
गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेचा तूं समुद्रा ॥
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्ने नेसी विलया ॥ ३ ॥
 
****************************
आरती करूं गणपतीला दे सुमतीला चरण कमला नमन हे करुनि भक्तिला ॥ धृ. ॥
मूषक वाहना सिंदूर वदना कलिमल दहना जन सुख सदना गाती जन तव गुण लीला देसिल्या त्वरीत दासाला ॥ १ ॥
त्रस्त मी होय संसारी प्रीती भारी कनकदारीं गांजिती मला हे भारी ॥
अघोर पापी ऎसा झालो, सद्‌बोधांमृत नच मी प्यालो दावून स्वरूप तूं करी मला पदरी दे ठाव दासाला ॥ २ ॥
 
****************************
जय श्रीगणेशा गणपति देवा, आरती मी करितो । मोरया आरती मी करितो ।
भक्तां संकटी पावुनी सकला प्रसन्न तू होतो ॥ धृ. ॥
भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थी, पार्थिव तुझ करिती । मोरया पार्थिव तुझ करिती ॥
भक्तां पावुनि अंती तयाला मोक्षाला नेसी ॥ १ ॥
नानापरिची द्रव्ये पुष्पें, तुजला अर्पिती । मोरया तुजला अर्पिती ।
मोदक आणिक रक्तफुलांवरी किती तुझी प्रिती ॥ २ ॥
भक्त रक्षणासाठी देवा, अष्टस्थानीं प्रकटशी । मोरया अष्टस्थानीं प्रकटशी ॥
तू मायेची फुंकर घालुनी, तयांस उद्धरशी ॥ ३ ॥
स्थावर क्षेत्री पंचदेवता, तुजला प्रार्थीती । मोरया तुजला प्रार्थीती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी, मोरेश्वर होसी ॥ ४ ॥
थेऊर क्षेत्रीं भक्त तुझे बहु, चिंता ते करिती । मोरया चिंता ते करिती ।
चिंता हरिशी म्हणुनी गणेशा चिंतामणि म्हणती ॥ ५ ॥
पल्लव क्षेत्री भक्त चिमुकलें, तुजला पूजिती । मोरया तुजला पूजिती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी, बल्लाळेश्वर होसी ॥ ६ ॥
दत्तात्रेय सुत विनवितसे चरणी । मोरया विनवितसे चरणी ॥
सर्व जनाते संकटी रक्षी, हीच असे विनवणी ॥ ७ ॥
 
****************************
जयदेव जयदेव जय एकदंता ॥ आरती ओवाळूं सद्भावें आतां ॥ध्रु०॥
सिद्धिविनायक निजसुखदायक विघ्नेशा ॥ सुरवरवरदा परात्पर तरवर पुरुषा ॥
सेंदुरचर्चित लंबोदर सुंदर वेषा ॥ महिमा न कळे शेषा अगम्य अगदीशा ॥१॥
श्रीमन्मंगलमूर्ति देवा गजवदना ॥ गणपति मति मजला दे सद्विद्यासदना ॥
शरणागत प्रतिपाळक चाळक जगजिवना ॥ निजरंगा नि:संगा करुणानिधाना ॥२॥
 
****************************
जयदेव जयदेव जयजय गजवदना । आरती ओवाळू तुज अद्वयरदना ॥धृ॥
शुंजादंड विराजित सुंदर परिकर । सर्वांगासीं लेपन केला सिंदूर ॥
मृगमद भाळीं शोभतसें दुर्वांकूर । दोंदावरुते चिमणा विलसे फणिवर ॥
स्वच्छंदें नेसुनिया पीतांबर पिवळा । लीलामंत्रे नाचतसे वेळोवेळीं ॥
निजभावें येउनियां सिद्धीचा मेळा । टाळ विणे घेउनियां गाती मंजूळा ॥२॥
हरिहर ब्रह्मादिक करिती तवस्मरण ।
नासुनि त्यांचें संकट करिस्सी निर्विघ्न ।
रघुविरस्मरहा प्रियकर गौरीनंदन ।
सद्भावें वंदितसे तुज नीरंजन ॥३॥
 
****************************
जयजयाजी विघ्नहरा ब्रह्मरूपा निर्विकारा ।
पंचारति ओवाळीन निजभावें लंबोदरा ॥धृ॥
दिव्यतेज:पुंज मूर्ति गजानन वक्रतुंड ।
शुर्पकर्ण एकदंत सरळ शोभे शुंडादंड ॥
नेत्रयुत्मी चंद्रसूय प्रभा फांकलि उदंड ।
चतुर्वेद मूर्तिमंत बाहु शोभति प्रचंड ॥१॥
रत्नखचित मुकुटावरि कलगि मोतियाचा तूरा ॥
नवरत्नमाळा कंठीं मध्यें शोभतसे हीरा ॥
केयूर कटकादि मिति नाहिं अळंकारा ।
पीतांबरावरि कांचिरत्नजडित कडदोरा ॥२॥
कस्तूरिचा टिळा भाळीं अंगिं सिंदूराची उटी ।
दिव्य पुष्पांचिया माळा दुर्वांकुर मुगुटीं ॥
पाशांकुश उर्ध्व करी हातिं मोदकाची वाटी ।
वेळोवेळा अभयकर होत असे भक्तासाठीं ॥३॥
 
****************************
सकळारंभी देव आदि गणपती ॥
ब्रह्मादिक हरिहर ऋषि मुनि ध्याती ॥
अकळे नकळे अगाध मंगलमूर्तिं ॥
जय जय करुणानिधी कल्याणकीर्ती ॥१॥
 
जयदेव जयदेव सिद्धी बुद्धी रमणा ॥
आरति (भावार्थी) ओवाळुं तुमचीया चरणा ॥जयदेव० ॥धृ०॥
 
विश्वाधीशा विराट स्वरुप विशाळा ॥
विश्व जन व्यापक अगाध लीला ॥
तारक भवाब्धि भक्त जन कृपाळा ॥
लक्षिता हा लक्ष निर्गुण निराळा ॥जयदेव० ॥२॥
 
ब्रह्मा विष्णु शिवादि तूं आदि मूर्ती ॥
नकळसी वेदशास्त्रा अगाध गुण कीर्ती ॥
मोरया गोसावी योगिया चित्तीं ॥
सबाह्य अभ्यंतर व्यापक गणपती ॥जयदेव० ॥३॥
 
 
****************************
झाली पूजा उजळुं आरती ॥
भक्तिभावें पुजा करुं विघ्नेशीं ॥
पूजेचा आरंभ करितो दुसरी ॥
कैसी पूजा तुझी नकळे अंतरीं ॥१॥
 
जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥
भक्तिभावें तुझें चरण हृदयीं ॥जयदेव० ॥धृ०॥
 
उजळीले दीप मनोमानसीं ॥
सुखें निद्रा (मोरया) करी तूं मंगलमूर्ती ॥
पूर्व पूण्य माया रचिली कुसरी ॥
भक्तिभावें तुज धरिले अंतरीं ॥जयदेव० ॥२॥
 
प्रपंचाची गती न कळे लौकीकीं ॥
किती भोग भोगूं विपरीत ध्याती ॥
म्हणुनी तुज शरण येतों (आलों) प्रतिमासीं ॥
ऐसा भक्तिभाव निरोपी तूजसीं ॥जयदेव० ॥३॥
 
समर्थासीं बोलणें नकळे मानसीं ॥
ऐसा सदोदीत देखिला भक्तिसीं ॥
मोरया गोसावी ह्मणे तुजसीं ॥
टाकिले वनवासी कवणाचे द्वारीं ॥जयदेव० ॥४॥
 
अर्चन करुनि तुह्मा केली आरती ॥
सूखें निद्रा (मोरया) करी तूं मंगलमूर्ती ॥
जय देव जयदेव जय(श्री) मंगलमूर्ती ॥
भक्तिभावें तुझें चरण हृदयीं ॥ जयदेव जयदेव ॥५॥
****************************
जय जय श्रीगजवदना, हे गणराया, गौरिकुमारा हो
करुणाकर सुकुमारा, महारणधीरा, गुण गंभिरा, हो ॥ध्रु०॥
 
शेंदुरवक्‍त्र-सुरंगित, अनुपम दोंदिल, रुप साजरें हो
शुंडादंड सुशोभित, सदा मद गंडस्थळिं पाझरे हो
कनक-कटक-मुकुटाच्यावर जडिताचे चमकति हिरे हो
श्रीकृष्णागरु चंदन अंगीं उटि मर्दित केशरें हो
मस्तकिं धरिसी बरवा हिरवा मरवा दुर्वांकुरा हो ॥जय जय० ॥१॥
 
कसित पितांबर पिवळा, गळां हार पुष्पांचे डोलती हो
तळपति कुंडलें कर्णीं, पंखे कर्णांचे हालती हो
सिद्ध, सरस्वति, ऋद्धि, सिद्धि, बुद्धीनें चालती हो
रुणझुण पैंजण चरणीं, वाणि गीर्वाणी, बोलती हो
वंदिति सुरनर पन्नग, निजगण वारिति शिरिं चामरें हो ॥जय० ॥२॥
 
सकळ मंगळारंभीं, सकळहि चिंतित चिंतामणी हो
चिंतन करि चतुरानन, गुणगण वर्णी दशशत फणी हो
नामस्मरणें पळती, कोटी विघ्नांच्या त्या श्रेणी हो
उद्धरि भक्‍त न हलतां, किंचित नेत्राची पापणी हो
त्राता तूं सर्वत्रां, रविशशिइंद्रासह सुरवरां हो ॥जय जय० ॥३॥
 
शरणांगत मी आलों, तुज फरशांकुश-मोदक-धरा हो
धांवे, पावे, कृपा कर सत्वर, यावें लंबोदरा हो
ओवाळिन आरती उजळुन दीपावळी कर्पूरा हो
वाहुनिया पुष्पांजलि पदयुग वंदिन जोडुन करा हो
विष्णुदास म्हणे, करी पावन वर देउनि किंकरा हो ॥जय जय० ॥४॥
 
 
****************************