मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

गणपती आरती संग्रह भाग 5

जयजयाजी विघ्नांतक हे गजानना ॥ पंचारति करितो तुज विश्वपालना ॥ धृ. ॥
 
कार्यारंभी प्रेमभरें पुजिति जे तुला ॥ सकल अघा हरुनि सुखी करिसी त्यांजला ॥
निजपद त्या देऊनिया हरिसी भ्रांतिला ॥ देसी भक्तजनां हे दयाघना ॥ जय ॥ १ ॥
 
दास विनवि निशिदिनी तुज गौरीनंदना ॥ सुप्रसन्न होऊनि दे भजनिं वासना ॥
सत्कीर्तिदायक ही बुद्धि या दीना ॥ विठ्ठलसुत मागतसे पुरवि कामना ॥ २ ॥
 
****************************
 
जय जय गणपति अघशमना ।
करितों आरती तव चरणा ॥ धृ ॥
 
छळिती षडरिपु बहु मजला। यांतुनि तारी जगपाला ॥
हरि या विविध तापाला। दॆन्यहि नेई विलयाला ॥
निशिदिनि करि मज साह्याला । विनंति ही तव पदकमला ॥
 
विठ्ठलसुत बहु प्रेमे विनवी तारी या दीना ।
दयाळा करिं मजवरि करुणा ॥ जय. ॥ १ ॥
 
****************************
 
जग ताराया अवतरलासी भक्त पूजिती सद्‌भावे।
कनवाळु तूं मुषकवाहन भक्तसंकटी तूं पावें ॥
बहु प्रेमानें ओवाळिन तुज मन वांछी तव गुण गावे।
विघ्नहराया येई झडकरी ऋद्धिसिद्धिसह तू धावे॥१॥
 
वक्रतुंड गुणवंत विघ्नहर गौरिनंदन गणपति जो।
आरति ओवाळीन मी त्यासी विघ्नांतक जगतारक  जो॥धृ.॥
 
शुंडा शोभे सिंदुरचर्चित मस्तकी मुकुट झळाळी ।
मुक्ताहार हे कंठी रुळती कस्तुरितिलक हा तव भाळी ॥
मोरेश्वर सुत वासुदेव तुज प्रार्थी दीना प्रतिपाळी ॥
भक्तजनातें मंगलमूर्ती रक्षीं अतिसंकटकाळीं ॥ २ ॥ वक्रतुंड गुणवंत ॥
 
****************************
आरती मी करिन तुला श्रीगजानना ।
वक्रतुंड एकदंत मुषकवाहना ॥ धृ. ॥
 
त्रिविधताप दूर करी गौरीनंदना ।
दॆन्य हरुनि तारी मला विघ्ननाशना ॥
भक्तसखा तूंची एक सिंदुरानना ।
मी निशिदिनी ध्यातो तुला दुष्ट भंजना ॥ १ ॥
 
पंचारती ओवाळिन पुरवि कमना ।
साह्य करीं निशिदिनि मज भक्तातारणा ॥
भाविक जन पुजिति तुला स्वहित साधना ।
वासुदेव लीन पदीं धरुनि धारणा ॥ २ ॥
 
****************************
गणराज आज सुप्रसन्न होई तूं मला।
करितों मी पंचारति मोरया तुला॥धृ.॥
 
मुषकवहनि बॆसुनिया येई धावुनि।
मममस्तकीं वरदहस्त्त तुवां ठेवूनी॥
पूर्ण करीं मम हेतु दयार्द होऊनी॥
लावी तव भजनी आजि दास विठ्ठला॥१॥
 
****************************
श्रीगणराया पार्वतितनया देई मज भेटी।
तव चरणाची देवा मजला आवड बहु मोठी॥धृ.॥
 
दीनजनांचा कॆवारी तूं अससी गणराया।
कार्यारंभी स्तविती तुजला विघ्ने वाराया॥
 
भक्तांचा तू ऎकुनि धांवा मुषकी बॆसुनियां।
त्वरितचि येसी सर्व संकटे निरसुनि ताराया॥
हेचि जाणुनि नारायणसुत शरण तुझ्या पायीं।
तरी दयाळा अजि मम करुणा येवो तव ह्र्दयी॥१॥
 
****************************
शिवतनया वक्रतुंड गौरीच्या बालका।
ओवाळू तुजलागी विश्वाच्या पालका॥धृ.॥
 
उंदीर वाहन तुझे वामांगी शारदा।
भक्तांते रक्षितोंसी वारुनियां आपदा॥
स्तवितो मी दिन तुजला सद्‌बुध्दी द्या सदा।
गणराया वर देई उद्धरि तूं भाविकां॥१॥
 
गिरिजांकी बॆसुनिया प्रेमाने खेळसी।
वधुनिया राक्षसाला लीलेते दाविसी॥
निशिदिनि जीं ध्याति तुजला सत्वर त्यां पावसी॥
प्रार्थीतसे वासुदेव तारी या सेवका॥२॥ शिवतनया.॥
 
****************************
जय जय आरती पार्वतिकुमारा गणपती ओवाळूं।
पंचही प्राणांच्या कर्पूरवाती  ज्ञाना़ग्रे जाळू॥धृ.॥
 
ओंकार प्रणवाक्षरी बीजापासूनि ध्वनि उठली।
ते हे माया त्रिगुणात्मकचि सगुंणत्वा आली॥जय.॥१॥
 
पंचभूतात्मक व्यापक एकचि घटक तुं जैसा।
दृष्टीगोचर नव्हसी कोणा गूळ गोडी तैसा॥जय.॥२॥
 
निगुण ज्योति सगुणा आली पुंडलिकासाठी।
विटेवर शोभे कटिकर उभा भीमेचे कांठी॥जय.॥३॥
 
ऎसी मूर्ति नित्यनिरंतर ध्यानी जे धरिती।
संकट त्यांचे दूर करी तूं श्रीमंगलमूर्ती॥जय.॥४॥
 
वायुतानें ह्र्दयिं ध्यायिली जसि राघवमुर्ती।
तसि हनुमंता तुझिया पायीं देई सद्‌भक्ती॥
जय जय आरती पार्वति कुमारा.॥५॥
 
****************************
गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
रुणझुण पायीं वाजति घुंगूर ।
गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी ।
पुजिती जन तुजला ॥ २ ॥
 
गंध पुष्प धुप दीप समर्पुनी ।
अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥
 
भक्त हरी हा आठवितो रुप ।
गातो तव लीला ॥ ४ ॥
 
****************************
जय जय जी विघ्नहरा आरती तुला॥
ओंवाळीन प्रेमरसी तारी तूं मला ॥धृ.॥
 
रत्नजडीत हेममुकुट मस्तकावरी।
शोभतसे पाशांकुश तुझिया करी॥
वारुनिया विघ्न समूह धांव झडकरी।
राही पाही येई मम सदना॥ गजवदना। अघदमना।शरण मी तुला॥१॥
 
आरती ही धरुनि करीं रुप पाहती।
गजमुख हे अति सुंदर शोभते किती।
गातो गुण वासुदेवा वंदी गणपती॥
धावें। पावें। यावें। विघ्नहरा। भक्तवरा वंद्यसुरा। सुखवि तूं मला॥२॥
 
****************************