महादेवाच्या या मंदिरातील नंदीचा आकार वाढतो
नंदी महाराजांची अनुमती मिळाल्याखेरीज महादेवांचे दर्शन मिळत नाही अशी मान्यता आपल्याकडे रूढ आहे. म्हणूनच शिवमंदिराच्या गाभार्यामध्ये नंदीची मूर्ती पाहावयास मिळते. भाविक आधी नंदी महाराजांचे दर्शन घेऊन मगच महादेवाच्या दर्शनाला जाताना आपण पाहतो. मग शिवमंदिर लहान असो, किंवा मोठे असो, नंदी महाराजांचे दर्शन आधी घ्यावे लागते. भारतामध्ये एक शिवमंदिर असेही आहे, जिथे असलेल्या नंदीच्या मूर्तीचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे असे म्हटले जाते.
पुरातत्त्व खात्यानेदेखील या मान्यतेचे समर्थन केले आहे. या नंदीच्या मूर्तीचा आकार इतका झपाट्याने वाढत आहे, की या मूर्तीला जागा पुरी पडावी याकरिता मंदिराचे एक-एक खांब हटविण्यात येत आहेत. जे भाविक फार पूर्वीपासून या मंदिरामध्ये येत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपूर्वी मंदिरामध्ये दर्शनाला आल्यानंतर गाभार्यामध्ये प्रदक्षिणा घालणे सहज शक्य असे. मात्र आता या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालण्याइतकी जागा शिल्लकच नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. आकारवाढणार्या नंदीची ख्याती ऐकून अनेक पुरातत्त्ववेत्ते आणि शास्त्रज्ञ मंडळींनी या मूर्तीचे संशोधन सुरु केले असता, दर वीस वर्षांमध्ये या मूर्तीचा आकार काही इंचांनी वाढत असल्याचे निष्पन्न त्यांच्या रिसर्चमध्ये झाले.