शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By वेबदुनिया|

क‍हाणी दिव्यांच्या आमावस्येची

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. एक नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा.

त्यांनी रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या आमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.

पुढं अमावस्येच्या दिवशी राजा शिकार करून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला. आपले गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गप्पा मारीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हावचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.
WD
इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू? मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा उदरांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी तिची फजिती झाली. सासू-‍‍दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणन मला हे दिवस आले.

ती दरवर्षी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय? म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करु लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो! साठा जन्माची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.