शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: लातूर , गुरूवार, 11 मार्च 2021 (11:09 IST)

सोयाबीन खरेदी केलेल्या शेतकर्यांचे सव्वादोन कोटी बुडविले : गुन्हा दाखल

इतरांपेक्षा अधिक पैसे देत असल्याचे भासवून सोयाबीन खरेदी करून संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा न करता शेतकर्यांना 2 कोटी 17 लाख 90 हजार 755 रुपयांना गंडा येथील राजीव गांधी चौकातील डोंगरे ट्रेडिंग कंपनीने घातला आहे.
 
पारी वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हा डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मूगाची थेट गावातून खरेदी करीत होता. बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देतो म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आपला माल विकण्यास सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे तो व्यापारी शेतकऱ्यांना पैसेही देत होता. यातून त्याने अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तानाजी निवृत्ती देवकर यांनी २०१८-१९ मध्ये त्यांच्या शेतातील पाच लाख ४० हजार रुपयांचे १३३ क्विंटल सोयाबीन डोंगरे याला दिले. त्यावर डोंगरे याने देवकर यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या नावे धनादेश दिले होते. परंतु, ते बँकेत वटले नाहीत. काही दिवसानंतर देवकर यांनी डोंगरे यांच्याकडे विकलेल्या सोयाबीनच्या पैशाची मागणी केली. परंतु, त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.
 
त्यानंतर देवकर यांनी अधिक माहिती घेतली. त्यांच्यासारख्या ४३ शेतकऱ्यांनाही डोंगरे याने पैसे दिले नसल्याचे समोर आले. या सर्व शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम दोन कोटी १७ लाख ९० हजार ७५५ रुपये असून या सर्वांची फसवणूक झाली आहे. याबाबत देवकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संशयित डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.