मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:40 IST)

आता ‘यूआयडीएआय’ने व्हर्च्यूअल आयडी सुरू होणार

aadhar card

आधारकार्डच्या सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर आता ‘यूआयडीएआय’ने व्हर्च्यूअल आयडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. व्हर्च्यूअल आयडी 16 अंकांचा असणार आहे. ओळखपत्रासाठी व्हर्च्यूअल आयडीची वापर होणार आहे. त्यामुळे 119 कोटी आधारकार्डधारकांची खासगी आणि गोपनीय माहिती सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. मार्च 2018 पासून व्हर्च्यूअल आयडीचा अंमल होणार आहे.

येत्या मार्च महिन्यापासून व्हर्च्यूअल आयडीची सुरुवात केली जाईल. मात्र, जूनपासून अनिवार्य केले जाईल. ज्या यंत्रणा या व्हर्च्यूअल आयडीच्याद‍ृष्टीने सुविधांमध्ये बदल करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. सध्या जे आधारकार्ड आहे, त्यात एकूण 12 अंक असतात. मात्र, व्हर्च्यूअल कार्डमध्ये 16 अंक असतील. 

सिमकार्ड व्हेरिफिकेशनसह विविध योजनांसाठी या व्हर्च्यूअल आयडीचा वापर करू शकतील. आधारकार्डधारकांना वेबसाईटवरून हा आयडी तयार करता येईल. हा क्रमांक तात्पुरता असेल. नव्याने व्हर्च्यूअल आयडी काढता येणार आहे. हा क्रमांक बदलताही येईल. त्यामुळे आधारक्रमांक द्यावा लागणार नाही.

कुणीही नागरिक ‘यूआयडीएआय’च्या वेबसाईटवर (https://uidai.gov.in) जाऊन आधीच्याच आधारकार्डच्या माहितीवरून व्हर्च्यूअल आयडी बनवू शकतो. 16 अंकांचा हा व्हर्च्यूअल आयडी ठराविक वेळेपुरता मर्यादित असेल. त्यामुळे मुदतीनंतर पुन्हा नवीन व्हर्च्यूअल आयडी बनवावा लागेल. व्हर्च्यूअल आयडीतून बँक किंवा फोन कंपन्यांना नागरिकांची केवळ मर्यादित माहिती (नाव, पत्ता, फोटो) मिळेल. एवढीच माहिती त्यांना गरजेची असते. व्हर्च्यूअल आयडीही ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ शकते. केवायसी करायचे असेल, तिथेही व्हर्च्यूअल आयडी स्वीकारला जाईल.