सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (13:25 IST)

अॅमेझॉनची 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा

- अॅनाबेल लियांग
अमेरिकेतल्या तंत्रज्ञान कंपन्यांमधील नोकऱ्या जाणं अद्यापही सुरू आहे. ट्विटर आणि फेसबूक नंतर अॅमेझॉन ने ही हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे.
 
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावे एक इमेल लिहिला आहे.
 
ज्या कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसेल त्यांना 18 जानेवारीपासून या संदर्भात सूचना मिळण्यास सुरुवात होईल असं त्यात म्हटलं आहे.
 
एकूण 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे. हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या सहा टक्के आहे.
 
अमेझॉन ने नोव्हेंबरमध्ये सुद्धा कर्मचारी कपातीची घोषणा केली होती.
 
अँडी जेसी ईमेल मध्ये म्हणतात, “ज्या लोकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे त्यांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आर्थिक मदत, आरोग्य विमा आणि दुसऱ्या कंपनीत नोकरी शोधण्यात आम्ही मदत करू.”
 
याआधीही विपरित परिस्थितीतून बाहेर निघण्यात अमेझॉन यशस्वी झालं आहे. पुढेही हा प्रयत्न सुरू राहील.” असं ते पुढे म्हणाले.
 
जगातल्या सगळ्यांत मोठ्या ई कॉमर्स कंपनीचा कारभार जगभर पसरलेला आहे. अमेरिका, भारत, युरोप या देशात कंपनीचे कर्मचारी आहेत.
 
कर्मचारी कपातीचा फटका कोणत्या देशाच्या लोकांना बसेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
 
मात्र युरोपमधल्या ज्या कर्मचाऱ्यांना  फटका बसेल तिथल्या कर्मचारी संघटनाशी आधी चर्चा केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
या कपातीत बहुतांश नोकऱ्या स्टार ऑपरेशन, People, Experience and technology या टीम मधून जाणार आहेत.
 
खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा मनोदय दोन महिन्यांपूर्वी कंपनीने व्यक्त केला होता.
 
अॅमेझॉन ने या आधी नवीन लोकांना नोकऱ्या देणं बंद केलं आहे. तसंच वेअरहाऊसचा विस्तार करणं थांबवलं होतं. त्यांनी कोरोनाच्या काळात लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या.
 
पर्सनल डिलिव्हरी रोबो सारख्या सुविधा या आधी देणं बंद केलं आहे.
 
याआधी ट्विटर आणि फेसबूक सकट अनेक कंपन्यांनी आर्थिक स्थिती पाहता कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे.