शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (17:12 IST)

बँक ग्राहकांसाठी खूशखबर, एका दिवसात चेक क्लिअर होणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं संपूर्ण देशातील बँकामध्ये चेक क्लिअरन्स प्रक्रियेला वेग देण्यासाठी सर्व बँकामध्ये सीटीएस लागू करण्याची घोषणा केली आहे. चेक ट्रंकेशन सिस्टिम लागू झाल्याने चेक क्लिअरन्सची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणार आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत सिस्टिम लागू करण्याची घोषणा केली गेली आहे.
 
मीडिया वृत्तानुसार, भारतात सर्वप्रथम सीटीएस सिस्टम 2010 मध्ये सुरू करण्यात आली. आतापर्यंत 1 हजार 219 क्लीअरिंग हाउसेसमध्ये सीटीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, दीड लाख बँक शाखांमध्ये याचा वापर केला जात आहे. तरीही अद्याप 18 हजार बँक शाखा या प्रणालीबाहेर असून आता सप्टेंबरपर्यंत सर्वीकडे ही प्रणाली कार्यान्वित करणं अनिवार्य असेल. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जातील, असं आरबीआयने डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी पॉलिसी निवेदनात स्पष्ट केलं आहे.
 
Cheque Truncation System चे फायदे
 
RBI ने दिलेल्या माहितीनुसार, सीटीएस प्रणालीअंतर्गत चेक प्रत्यक्ष एका बँकेतून दुसर्‍या बँकेत नेण्याऐवजी त्याची इलेक्ट्रॉनिक प्रतिमेसह MICR Band, तारीख, बँक खाते तपशील इत्यादी आवश्यक माहितीही पाठवली जाते. यामुळे वेळेची बचत होते आणि चेक गहाळ होणे, गैरवापर होणं यासारख्या धोक्यापासून वाचता येतं.
 
ही प्रणाली लागू झाल्यावर खर्च आणि वेळेची बचत होईल. धनादेश वठण्याची प्रक्रिया अगदी जलद होईल आणि परिणामस्वरुप एका दिवसात चेक क्लिअर होतील. त्यामुळं सीटीएस प्रणाली सर्वच दृष्टीनं फायद्याची आहे, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. ही प्रणाली अतिशय सुरक्षित आणि कार्यक्षम यंत्रणा आहे.