मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (12:28 IST)

ड्रायफ्रूट्स महागले, तालिबानने थांबवला भारताशी व्यापार

काबुलवर ताबा घेतल्यानंतर तालिबानने भारतातून सर्व आयात-निर्यात बंद केली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांनी बुधवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी केलेल्या संभाषणात ही माहिती दिली. ते म्हणाले की, तालिबानने पाकिस्तानच्या ट्रांजिट मार्गाने मालाची वाहतूक बंद केली आहे. यामुळे भारतातून मालाची वाहतूक देशात थांबली आहे.
 
त्यांनी म्हटले की “आम्ही अफगाणिस्तानमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. तेथून आयात पाकिस्तानच्या पारगमन मार्गाने होते. आता तालिबानने पाकिस्तानातून मालाची वाहतूक बंद केली आहे, त्यामुळे आयात जवळपास थांबली आहे.
 
भारत हा अफगाणिस्तानचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे. आतापर्यंत, 2021 मध्ये नवी दिल्लीहून काबुलला 83.5 कोटी डॉलर्स (सुमारे 6262.5 कोटी रुपये) किंमतीच्या वस्तूंची निर्यात झाल्या आहेत.
 
त्याच वेळी, अफगाणिस्तानातून भारतात सुमारे 51 कोटी डॉलर (सुमारे 3825 कोटी रुपये) किंमतीच्या वस्तू आयात केल्या गेल्या आहेत. व्यापाराव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. भारताद्वारे देशात चालवल्या जाणाऱ्या 400 हून अधिक प्रकल्पांमध्ये तीन अब्ज डॉलर्स (सुमारे 225 अब्ज रुपये) ची गुंतवणूक असल्याचा अंदाज आहे.
 
अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीमुळे येत्या काही दिवसांमध्ये सुक्या फळांच्या किमती वाढण्याची भीती फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने व्यक्त केली आहे. भारत अफगाणिस्तानमधून सुमारे 85 टक्के सुका मेवा आयात करतो.