गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (14:48 IST)

विरोधकांचा विधान परिषदेत पुन्हा गोंधळ; कामकाज तहकूब

विरोधकांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज 25 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.
 
"माझी प्रतोद म्हणून निवड केली आहे. नियमानुसार आम्हाला व्हिप बजावण्याचा अधिकार आहे", असं शिवसेनेचे नवे प्रतोद विप्लव बाजोरिया यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
"विधानपरिषदेत बहुमत त्यांचं असलं तरी नियमानुसार पक्ष आमचा आहे. आम्हि परिषदेतही व्हिप बजावणार.
 
अंबादास दानवेसह इतरांना तो लागू असेल, दानवेंना हटवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल", असं ते पुढे म्हणाले.
 
विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कांदा आणि कापसाच्या दराचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसून सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठीशी ठाम असल्याचं नमूद केलं. तसेच, सरकार कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
 
विरोधकांनी कांद्याला रास्त भाव मिळण्याची मागणी करत विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. यावेळी विरोधी पक्षाचे आमदार डोक्यावर कांद्याच्या पाट्या घेऊन भवनात दाखल झाले. कांद्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या.
 
3-4 रुपये किलो दराने शेतकऱ्यांचा कांदा खपत असेल, तर शेतकऱ्यांनी काय करावं. या सरकारला कांद्याचा हार घालायला आम्ही आलोय. लाखो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे.
 
गिरीशभाऊ, आता कुठे आहात- खडसेंचा सवाल
"कापूस उत्पादक हवालदिल झाला आहे. मालेगावमध्ये काल बाजार बंद होता. कापूस एकाधिकार योजना बंद झाली आहे. गिरीशभाऊ साडेसात हजार भाव मिळावा म्हणून दहा दिवस उपोषण केलं होतं.
 
गिरीशभाऊ मंत्रिमंडळात फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना तुम्ही कापसासाठी उपोषणाला बसला होता आता कुठे आहात"? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
 
'कंबोजला पाहिलेलं नाही, पाच फोन लावले असले तरी राजकारण सोडणार'
“राजकारण बदललं आहे. फडणवीस सुसंस्कृत पक्षातून आले आहेत, परंतु त्यांनी राजकारण खराब केलं असा आरोप मी काल केला होता. अशावेळी त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण वक्तव्य केल्यावर फडणवीसांचे फ्रंट मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे मोहात कंबोज यांनी आरोप केला.
 
भास्कर जाधव गुवाहटीला तिकिट काढून तयार होते असे आरोप त्यांनी केले. पक्षात घ्या म्हणून निवेदन दिलं.
 
मी कधीही कंबोजला पाहिलेलं नाही. मी आव्हान देतो की मोहीत कंबोजने यातला एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. तुमच्या पोलीस खातं आहे, यंत्रणा आहे. मी एकनाथ शिंदे यांना शंभर काय पाच जरी फोन लावले असतील तर राजकारण सोडायला तयार आहे. मी कोणाच्याही दरवाजात उभा राहिलेला नाही. तर शिंदेंच्या दरवाजावर काय जाणार. कंबोज 100 बापाची औलाद नसेल तर त्याने हे सिद्ध करून दाखवावं”, असं भास्कर जाधव म्हणाले.
 
'सरकारनं पावलं उचलली नाहीत तर आम्ही सरकारला कांद्यासारखं सोलून काढू,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले.
 
'आशिष शेलारांनी हवेत बार उडवणारी टोळी निर्माण केली आहे'
“आशिष शेलारांनी हवेत बार उडवण्याची टोळी निर्माण केली आहे. तुम्ही गेल्या 6 महिन्यातलं बोला. नगरविकास खात्याबाबत तुम्ही याचिका दाखल केली आहे. त्यात काय म्हटलंय त्यांनी?
 
"तो कुणाचा घोटाळा आहे. त्या घोटाळेबाजांच्या नेतृत्वाखाली तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात. एनआयटी घोटाळा काय आहे हे आशिष शेलारांनी सांगावं," असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "मी आजपासून शिवगर्जना मोहिमेसाठी निघालो आहे. निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे आमच्याकडचं शिवसेना हे नाव गेलंय. पण जनता आमच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. या जनतेला अभिवादन करण्यासाठी आणि शिवसैनिकांना पाठबळ देण्यासाठी शिवगर्जना मोहीम सुरू आहे".
 
“दोन तासांसाठी सीबीआय किंवा ईडी कुणाकडेही आली, तर तो देशाचा बादशाह होईल. पण हे लोकशाहीला धरून नाही. आजही अलोकशाही पद्धतीने हा देश चालतोय. फक्त विरोधी पक्ष आहेत म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. तुमच्या पक्षात फक्त संत-महात्मे बसलेत का की जे दररोज हिमालयातून मंत्रालयात अप-डाऊन करतायत”? असा सवाल त्यांनी केला.
 
ज्यांना यायचं असेल त्यांच्यासाठी दरवाजे खुले
दरम्यान भास्कर जाधव यांनी शिंदे गटात येण्यासाठी अनेक कॉल्स केले होते असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी म्हटलं होतं. त्यासंदर्भात बोलताना भरत गोगावले म्हणाले, "भास्कर जाधव शिंदे गटात येण्यास इच्छुक होते यात तथ्य आहे.
 
पण आता मोहित कम्बोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते. तेव्हा भास्कर जाधव आणि मुख्यमंत्र्यांचं संभाषण चालू असायचं. ते आम्हालाही माहिती होतं. पण आता काय झालंय कल्पना नाही.
त्यांना पटलं तर आम्ही त्याचा विचार करू. आमचा त्यांना विरोध नव्हता. आम्हाला उलट संख्याबळ वाढवायचं होतं. कुणी तसं सांगत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना जर यायचं असेल, तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत".
 
"मी नीलम गोऱ्हेंना पत्र दिलंय. वरच्या सभागृहात ही सुरुवात झाली आहे. बाजोरिया यांना हे पद दिल्यामुळे पुढच्या घडामोडी पाहाता येतील. काल आम्ही गोऱ्हेंना पत्र दिलं आहे. शिवसेना पक्षाची मान्यता आम्हाला मिळाली आहे.त्यामुळे व्हीप किंवा इतर गोष्टी आमच्या चालतील. त्यामुळे आमच्या अर्जावर वर विचार केला जाईल", असं गोगावले म्हणाले.