शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील सावळागोंधळ आता समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक असलेले शेकडो लाभार्थी असल्याचे उघड झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी यासंदर्भात बैठक घेणार आहेत. राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील सावळागोंधळ आता समोर येत आहे. एकच आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक असलेले लाखो लाभार्थी या यादीत दिसत आहे. उदाहरणार्थ, दिलीप काचळे या शेतकऱ्याचे आधार क्रमांक ११११११११०१५७ आणि बँक खाते क्रमांक १११११११११११ आहे. तर बाळकृष्ण रामघंगाळी यांचे आधार कार्ड क्रमांक ११११११११०१५७ आणि बँक खाते क्रमांकही १११११११११११ आहे. अशा शेकडो लाभार्थ्यांचे आधार आणि बँक खाते क्रमांक एकच असून यामुळे राज्य सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही के गौतम म्हणाले, आम्हाला एकच आधार आणि बँक खाते क्रमांक असलेले लाभार्थी बघून धक्काच बसला. शेकडो लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक एकच कसा असू शकतो. याशिवाय एकाच शेतकऱ्याच्या नावाने सहा कर्ज खाते आणि एका शेतकऱ्याचे नाव एकाच यादीत तीन वेळा झळकल्याचे समोर आले आहे.