14 बँकांचे 824 कोटी बुडवून दाम्पत्य फरार
तमिळनाडूतील प्रसिद्ध दागिने कंपनी असलेल्या कनिष्क गोल्डने 14 बँकांना तब्बल 824 कोटींना गंडा घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या 14 बँकांमध्ये पीएनबीसह, एसबीआय आणि बँक ऑफ इंडिया सारख्या बँकांचाही समावेश आहे.
चेन्नईच्या टी नगरमध्ये कनिष्क ज्वेलरीचे ऑफिस आहे. भूपेश कुमार जैन आणि त्यांची पत्नी नीता जैन हे कंपनीचे प्रमोटर्स आणि डायरेक्टर्स आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे. सध्या ते मॉरिशसमध्ये राहत असल्याची माहिती आहे.
बँकेने भूपेशवर बनावट दस्तऐवजांच्या आधारे कर्ज घेतल्याप्रकरणी आणि एका रात्रीत सर्व शोरूम आणि फॅक्टरी बंद करून फरार झाल्याचा आरोप केला आहे. मात्र अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. जैनला 824 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, पण व्याज आणि मुद्दलासह आता कर्जाची रक्कम 1000 कोटींच्या वर गेली असल्याचे बँकांचे म्हणणे आहे.