शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एलआयसीचा पॉलिसी विक्रीचा नवा विक्रम

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पश्चिम विभागाने पॉलिसी विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पश्चिम विभागाने वर्षभरात ३४.४३ लाख नवीन पॉलिसींची विक्री करून तब्बल ९ हजार २ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. एलआयसीच्या कोणत्याही विभागाला आजवर एवढी मजल मारता आलेली नाही.
 
एलआयसीचे देशभरात आठ प्रादेशिक विभागानुसार काम चालते. त्यातील पश्चिम विभागाचे हप्त्यापोटी उत्पन्नातील योगदान २१ टक्के इतके आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दीव-दमण यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचे क्षेत्रिय व्यवस्थापक विपीन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात आलेल्या नवीन योजनांच्या विक्रीतून ही कामगिरी करणे शक्य झाले आहे. तसेच पेन्शन आणि गट विम्यातून नवीन व्यवसायापोटी उत्पन्नातही पश्चिम विभागाने १३ हजार २०० कोटींच्या लक्ष्यापेक्षा १९ हजार कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे.
 
किमान एक कोटी रुपयांचे विमा कवच असलेली जीवन शिरोमणी त्याचप्रमाणे बीमा श्री या योजना ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. पश्चिम विभागाच्या हप्त्यापोटी उत्पन्नातील वाढीत या योजनांचे मोठे योगदान आहे. जीवन अक्षय्य-६ सारख्या पेन्शन योजनेच्या असाधारण कामगिरीचे मोठे योगदान असून या एकल प्रिमियम योजनेतून तब्बल ४ हजार ६०० कोटी रूपयांचे हप्त्यापोटीचे उत्पन्न पश्चिम विभागाला मिळाले आहे.