शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (22:01 IST)

.रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; तब्बल ६७० रेल्वे गाड्या रद्द

देशात अभूतपूर्वरित्या कोळशाचा तुटवडा उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोळशाची आवश्यकतासुद्धा वाढली आहे. देशातील वीजनिर्मिती केंद्रांमध्ये तत्काळ कोळसा पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेला गेल्या काही आठवड्यांमध्ये दररोज जवळपास १६ मेल, एक्स्प्रेस आणि प्रवासी रेल्वे रद्द कराव्या लागल्या आहेत.
 
रेल्वे मंत्रालयाने २४ मेपर्यंत प्रवासी रेल्वेच्या जवळपास ६७० फेऱ्या रद्द करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ५०० हून अधिक गाड्या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस आहेत. रेल्वे विभागाने कोळशाच्या रेल्वेगाड्यांची सरासरी दैनंदिन लोडिंग ४०० हून अधिक वाढविली आहे. गेल्या पाच वर्षांमधील ही सर्वाधिक संख्या आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले, की भारतीय रेल्वेने सध्याची कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज ४१५ कोळसा रेक (रेल्वे) उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी प्रत्येक रेल्वेत जवळपास ३५०० टन कोळसा ने-आण केला जाऊ शकतो. वीज संयंत्रांमधील कोळशाच्या साठ्यात सुधारणा होण्यासाठी तसेच पावसामुळे कोळसा उत्खननाचे काम थांबत नाही, तोपर्यंत जुलै-ऑगस्टमध्ये कोणत्याही संकटापासून वाचण्यासाठी असे किमान दोन महिन्यांपर्यंत करावे लागणार आहे.
 
रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी सांगतात, विविध राज्यांमध्ये रेल्वेगाड्या रद्द केल्याच्या विरोधात प्रवासी निदर्शने करत आहेत. परंतु आमच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नाही. सध्या वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज संयंत्रांमध्ये कोळशाच्या पुरेसा साठा ठेवण्यास सुनिश्चित करणे हेच आमचे काम आहे. आमच्यासाठी ही द्विधा मनःस्थिती आहे.
 
अधिकृत आकडेवारीनुसार, रेल्वेने २०१६-१७ मध्ये दररोज जेमतेम २६९ कोळसा रेक लोड केला आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये तो वाढविण्यात आला होता. परंतु पुढील दोन वर्षांच्या दरम्यान वाहतूक घटून दररोज २६७ रेक झाली आहे. गेल्या वर्षी तो वाढवून दररोज ३४७ रेक करण्यात आला होता. गुरुवारपर्यंत कोळशाने भरलेल्या गाड्यांची संख्या दररोज जवळपास ४००-४०५ इतकी झाली आहे. या वर्षी कोळशाची मागणी अभूतपूर्व प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रेल्वे हेच परिवहनाचे मुख्य साधन ठरले आहे.