मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 11 जुलै 2020 (09:17 IST)

मुकेश अंबानी आता जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती

गूगलचे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन तसंच बर्कशायर हॅथवेचे वॉरन बफे यांना मागे काढत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मुकेश अंबानी हे जगातील अव्वल १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत संपूर्ण आशियातील एकटेच आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती ७० अब्ज डॉलर आहे.
 
गेल्या २० दिवसांत मुकेश अंबानी यांची संपत्ती ५.४ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. २० जून रोजी फोर्ब्सच्या यादीत अंबानी नवव्या क्रमांकावर होते. रिलायन्स इंडस्ट्रीजची बाजारपेठ नुकतीच १२ लाख कोटींवर गेली असून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अंबानींचा वाटा ४२ टक्के आहे. कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे. फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीश क्रमवारी मालमत्ता शेअरच्या किंमतीच्या आधारे निश्चित करते. आज रिलायन्सचा शेअर १८७८.५० रुपयांवर बंद झाला तर कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १८८४.४० रुपये आहे. फेसबुक, सिल्व्हर लेक, केकेआर, अबू धाबी इनवेस्टमेंट यासह अंबानींच्या जिओमध्ये एकूण १२ जणांनी गुंतवणूक केली.
 
श्रीमंत यादीत जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण मालमत्ता १८८.२ अब्ज डॉलर्स आहे, बिल गेट्स दुसर्‍या क्रमांकावर (११०.७० अब्ज डॉलर्स), बर्नाड ऑर्नोल्ट फॅमिली तिसऱ्या क्रमांकावर (१०८.८ अब्ज डॉलर), चौथ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग (९० अब्ज डॉलर्स), स्टीव्ह बाल्मर पाचव्या क्रमांकावर (७४.५ अब्ज डॉलर), लॅरी एलिसन सहाव्या क्रमांकावर (७३.४ अब्ज डॉलर्स), मुकेश अंबानी सातव्या क्रमांकावर (७०.१० अब्ज डॉलर्स) आहेत. यानंतर वॉरेन बफे, त्यानंतर लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा क्रमांक लागतो.