सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (13:24 IST)

2000च्या नोटा आता जास्त का दिसत नाहीत?

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांत असलेले भारतीय चलनाचे 86 टक्के मूल्य एका दिवसांत (आठ नोव्हेंबर 16) काढून घेणे, हा मोठा धक्का होता. ते मूल्य लवकर भरण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या. कारण कमी काळात (कमी मूल्याच्या) नोटांची छपाई करणे शक्‍य होते. या नोटा चलनातून हळूहळू कमी होतील आणि 500, 100 च्या नोटा वाढतील, नव्हे, ते करावेच लागेल, अशी मांडणी त्यावेळी अर्थक्रांती प्रतिष्ठानने केली होती. आता नऊ महिन्यांनी ती प्रक्रिया सुरू झाली आहे. 2000 च्या नोटा फार दिवस चलनात राहणार नाहीत, असे रिझर्व्ह बॅंक जाहीरपणे म्हणू शकत नाही, याचा गैरफायदा अनेक विद्वानांनी घेतला. पण आता ताज्या माहितीनुसार एटीएममध्ये 2000 च्या नोटा कमी मिळू लागल्या आहेत. 500 च्या नोटा वाढल्या आहेत. 200 रुपयांच्या नोटांची छपाई सुरू झाली आहे. 2000 च्या नोटा रिझर्व्ह बॅंक आता देईनाशी झाली आहे, अशी माहिती एटीएमचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्या देत आहेत. ती आणि रिझर्व बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार 100 आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांचे आठ नोव्हेंबर 2016 पूर्वीचे एकूण मूल्य 2.5 लाख कोटी एवढे होते, ते मे 2017 मध्ये चार लाख कोटी झाले आहे. (म्हणजे वाढले आहे.) 500 च्या नोटांचे एकूण मूल्य नोटाबंदीपूर्वी 8.1 लाख कोटी होते, ते आता 4.1 लाख कोटी इतके कमी करण्यात आले आहे. 1000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य नोटाबंदीपूर्वी तब्बल 6.4 लाख कोटी होते, पण ती रद्द करून काढण्यात आलेल्या 2000 रुपयांचे एकूण मूल्य 5.5 लाख कोटी (मे 2017) एवढेच ठेवण्यात आले होते. (म्हणजे 2000 च्या नोटांचे एकूण मूल्य 1000 च्या नोटांपेक्षा कमी ठेवण्यात आले होते.) आता ते आणखी कमी केले जात आहे. नोटाबंदीपूर्वी 17 लाख कोटी एवढे मूल्य असलेले चलन वापरात होते. पण 23 जून 2017 च्या आकडेवारीनुसार रिझर्व्ह बॅंकेने 14.5 लाख कोटी मूल्य असलेल्याच नोटा छापल्या आहेत. याचा अर्थ अडीच लाख कोटीचे चलन छापण्यात आलेले नाही. यामुळे काही काळ काही भागांत चलन तुटवडा निर्माण झाला, हे खरे असले तरीदेशात डिजिटल व्यवहार वाढावेत, हा त्यामागील उद्देश असू शकतो. त्यामुळे यापुढे 2000 च्या नोटा व्यवहारातून कमी होत जाणार आहेत.