शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (08:18 IST)

आता मिरची पावडरमध्येही भेसळ, मालेगावला "इतक्या" लाखांचा मुद्देमाल जप्त

ऐन दिवाळीत मिरची पावडरमध्ये खाण्यास अयोग्य रंग टाकून टिका फ्राय भेसळयुक्त मिरची मसाला तयार करणाऱ्या मालेगावजवळील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सव्वा लाख रुपयांची मिरची पावडर आणि 24 हजारांची मसाला पाकिटे असे 1 लाख 96 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे मालेगाव परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
 
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्रेते व निर्मात्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून,  मालेगाव तालुक्यातील मलादे येथील गट नं. 41, प्लॉट नं. 114, गुलशन ए मदिना, सी- मॉ मसाले प्रॉडक्ट प्रा.लि.,   या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी धाड टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी मिरची व मसाल्याचे उत्पादन सुरू होते.
 
त्याठिकाणी मिर्ची व मसाल्यामध्ये कायद्याप्रमाणे रंग वापरण्यास बंदी असलेला खाद्य रंग साठविलेला आढळून आला. या रंगाचा वापर अन्न व्यवसायीकाने टिका फ्राय मसाला व मिर्ची पावडरमध्ये केला असल्याचा दाट संशयावरून त्यानंतर देशमुख यांनी टिका फ्राय मसाला (800 पॅकेट किंमत रक्कम रुपये 24 हजार). कुठल्याही लेबल नसलेल्या गनी बॅगमध्ये 538 किलो किंमत मिरची पावडर, (किंमत रुपये 1 लाख 61 हजार, 400 रुपये) व सुमारे 740 रुपये किमतीचा 8.50 किलो भेसळीचा रंग असा एकूण 1 लाख 95 हजार 600 रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.
 
या साहित्याचे नमुने घेण्यात आले असून, ते अन्न विश्लेषकास पाठविण्यात येत असून अहवाल आल्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी सह आयुक्त सं. भा. नारागुडे, तसेच सहायक आयुक्त (अन्न). विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.