शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:42 IST)

सोमवारपर्यंत कांदा लिलाव सुरू करा, अन्यथा परवाने रद्द

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यावर गुरुवारी आयकर विभागाने घातलेल्या छाप्यानंतर लिलावात कांद्याचे भाव सुमारे 30 टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळे शुक्रवारी काय भाव निघतात, याकडे लक्ष लागून होते, परंतु छाप्यांच्या निषेधार्थ व्यापा-यांनी लिलावांवर बहिष्कार घातल्याने, व्यवहार ठप्प झाले. याकडे पाहाता जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी सोमवारपर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कांदा व्यापा-यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतक-यांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापा-यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील चार ते पाच दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत असतानाच गुरुवारच्या धाडसत्रामुळे भावातील घसरण अधिक वेगाने झाली.यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे.